बाळासाहेब माने हे भारतीय जनता युवा मोर्चा या युवा संघटनेतून पुढे आलेले नेतृत्व. वडिल कै. यशवंतराव, कै. तात्यासाहेब नातू, माजी आमदार शिवाजीराव गोताड, कुसुमताई अभ्यंकर यांचा यांचा राजकीय वारसा आणि डॉ. ज. शं. केळकर, डॉ. शांताराम केतकर यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांना समाजकारणाचे बाळकडू मिळाले. भाजपची स्थिती फारशी चांगली नसतानाही प्रवाहाच्या विरोधात पोहत जाऊन माने यांनी यश मिळवले. सकारात्मक वृत्ती, काळाप्रमाणे पुढे जाण्यासाठी नीती जनसामान्यांना आपलेसे वाटणारे हे व्यक्तीमत्व कमलपुष्पाप्रमाणे फुलून आले. सामान्य कार्यकर्ता ते पक्ष पदाधिकारी व आमदार हा प्रवास सहज सुकर नव्हता. चढउतार, कटू-गोड प्रसंग यातून त्यांनी वाटचाल केली आहे. रा. स्व. संघाच्या तालमीत तयार झालेल्या बाळ माने यांनी भाजपची बांधिलकी स्वीकारून, भाजपची तत्त्वप्रणाली, भाजपचे नेतृत्व यावरविश्वास ठेवून भाजपचे कार्य तळागाळात पोहोचवले. समाजाशी असलेली विकासाची नाळ माने यांनी कधीच तोडली नाही. आज बाळासाहेब मोदीदूत म्हणून जिल्ह्यात कार्य करत आहेत. अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा निष्ठावंत दूत!
रत्नागिरी तालुक्यासह जिल्ह्यात विविध कार्यक्रम, बैठका,भेटीगाठींच्या माध्यमातून ते संवाद साधत असतात. सर्वांची आस्थेने चौकशी करून ते सर्वांना आपलेसे करतात. उपजत गुणांच्या जोरावर अनेक दिग्गजांचा सक्रिय पाठिंबा माने यांनी मिळवला आणि जनसामान्यांना आपलेसे वाटणारे हे व्यक्तिमत्त्व कमलपुष्पाप्रमाणे फुलून आले. बाळासाहेब माने यांचा स्वभाव आक्रमक असला तरी तितकाच दृष्टिकोन सकारात्मक असतो. जनसामान्यांमध्ये मिसळण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. यामुळेच आजही जिल्ह्यात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे.
भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या २०४७ मधील विकसित भारताच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी अनेक हात कामाला लागले आहेत. त्यातील एक हात म्हणजे बाळासाहेब माने. आज आमदार किंवा खासदार नसताना पक्ष संघटना कायम धरून कार्यकर्त्याना एकसंघ ठेवण्यासाठी बाळासाहेब धडपडताना दिसतात. केंद्र आणि राज्य शासनाच्या वेगवेगळ्या योजना तळागाळात पोहचविताना त्याचा जास्तीत जास्त लाभ कोकणाला कसा घेता येईल, हे ते पाहत असतात. कदाचित त्यामुळे त्यांचा जनाधार वाढतच आहे. निष्ठा असावी तर बाळासाहेब यांच्यासारखी! पराभव दिसताच पक्ष बदलणारे अनेक भित्रे नेते आपण पाहिला असाल, पण बाळासाहेब मुळात निर्भीड आणि संघर्ष करणारे त्यामुळे त्यांनी कधीही पलायनवाद स्वीकारला नाही. पक्ष म्हणेल ती जबाबदारी पेलली, त्यामुळेच आजही रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेंच्या मनात निष्ठावंत म्हटलं की बाळासाहेब माने घर करुन राहिले आहेत.
कोकणात मत्स्य व्यवसाय वाढावा, इथला शेतकरी सबल व्हावा, पर्यटन व्यवसाय वाढून इथल्या भूमीपुत्राना रोजगार मिळावा, आंबा – काजू व्यवसायला अच्छेदिन यावेत, मराठी शिक्षणासोबत इंग्रजी आणि जगातील महत्वाच्या भाषांचे शिक्षण कोकणात मिळावे, यासह अनेक संकल्प माने यांच्या बोलण्या-वागण्यातून आम्हाला अनुभवायला मिळतात. केवळ रस्ते आणि पाखड्या यापुरता विकास मर्यादित न राहता कोकणच्या माणसाचे दरडोई उत्पन्न वाढायला हवे,असे बाळासाहेब कायम म्हणत असतात. अजातागायत असे व्हिजन ठेवून असणारे नेते रत्नागिरी जिल्ह्यात दुर्मिळ होत आहेत. आजही जिल्ह्यात रस्ते धड नाहीत, रोजगाराची साधने नाहीत, दळणवळण सेवा अपुऱ्या आहेत, अश्यात अनेक उद्योग बंद पडत आहेत. त्यामुळे लघु उद्योगाची कास धरण्याचा मंत्र बाळासाहेब तरुणांना देतात. शासनाच्या विविध योजनातून अर्थसहाय्य घेऊन उद्योजक बना, असे आवाहन माने करताना कायम दिसतात.
आयुष्मान योजनेच्या माध्यमातून बाळासाहेब कार्य करत आहेत. यश फौंडेशनच्या माध्यमातून रुग्णमित्र ही संकल्पना माने राबवित आहेत. एका बाजूला रत्नागिरीच्या स्वास्थ्याची काळजी मोदीदूत म्हणून बाळासाहेब माने काम करत आहेत. पीएम किसान योजना शेतकऱ्यांच्या घराघरात कशी पोहचेल याबाबत बाळासाहेब माने कार्य करत आहेत. त्याशिवाय बारा बलुतेदारांसाठी असलेल्या विश्वकर्मा योजनेचा बलुतेदारांना लाभ मिळावा, यासाठी माने जीव ओतून कार्य करत आहेत. याशिवाय पक्षाने दिलेल्या जबाबदारीतुन मेरा बूथ सबसे मजबूत या मुलमंत्रातून रत्नागिरी जिल्ह्यातील आगामी सर्व निवडणुकात भाजपच्या कमळ चिन्हावर जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. यातूनच महाविजय २०२४ नक्कीच साध्य होईल, यात शंकाच नाही!
माने यांनी राजकीय जीवनात चढउतार पाहिले. मात्र ते कायम त्यातून धडा घेत संघर्ष करत राहिले. आजही माने यांचा पक्ष वाढीसाठी घर ते घर दौरा असतो. न थकता ते प्रत्येकाच्या घरात जाऊन मोदींना समर्थन मागत असतात. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात माने २०२४ च्या निवडणुकीत मोदीजींना एक खासदार देण्यासाठी चप्पाचप्पा पिंजून काढतात. त्यात असणारा उत्साह हा विशितील तरुणांना लाजवेल असा आहे. अर्थात त्यांच्यासोबत फिरताना एक लक्षात आले की माने यांनी जोडलेला भाजपचा मतदार अजून माने यांना आमदार व्हा, असे आशीर्वाद देतो. आणि माने हसत म्हणतात, ‘पक्ष सांगेल तसे’! या वाक्यात निष्ठा या शब्दाला परिपूर्णता आली आहे. बूथ मजबूत तर पक्ष मजबूत या धोरणातुन माने यांनी प्रत्येक बूथवर जाऊन बूथ बांधणी केली आहे. मी त्याला साक्षीदार आहे. गेल्या अनेक वर्षात इथल्या निवडणुकात पक्ष बांधणीबाबत जे कुणाला जमलं नाही ते माने यांनी आपल्या संपूर्ण भाजपच्या टीमला सोबत घेऊन करुन दाखवलं! त्यामुळेच आज विधानसभा मतदारसंघात भाजप भक्कम स्थितीत आहे.












