संगमेश्वर :
मदार–तिरुवनंतपुरम स्पेशल ट्रेनला संगमेश्वर येथे अधिकृत थांबा मंजूर झाल्याने स्थानिक प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी या गाडीला संगमेश्वर स्थानकावर थांबा नव्हता, त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
या थांब्यासाठी ‘निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर रेल्वे ग्रुप’च्या वतीने कोकण रेल्वेकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. तसेच पद्मश्री गजानन माने यांच्या अध्यक्षतेखाली कोकण रेल्वेचे CMD संतोष कुमार झा यांच्यासोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत या गाडीच्या थांब्याचा मुद्दा मांडण्यात आला होता. त्या वेळी लवकरच थांबा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
या सर्व प्रयत्नांना अखेर यश आले असून, आज संबंधित गाडीच्या संगमेश्वर थांब्या संदर्भात अधिकृत पत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे संगमेश्वर व परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.











