ड्रग्स मुक्त अभियान अंतर्गत मालवणात जनजागृती व कारवाई होणार

मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची माहिती

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्गचे जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अगरवाल यांच्या संकल्पनेतून जिल्हाभरात ड्रग्स मुक्त सिंधुदुर्ग जिल्हा हे अभियान सुरु करण्यात आले आहे. २४ जानेवारी पर्यंत राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत मालवण तालुक्यात ड्रग्स विरोधी व व्यसनमुक्ती बाबत जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच अवैध ड्रग्स धंद्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती मालवणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे म्हणाले, ड्रग्स मुक्त सिंधुदुर्ग अभियान अंतर्गत मालवण तालुक्यात जनजागृती व कारवाई असे दोन टप्पे राबविण्यात येणार आहेत. शाळा, महाविद्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी ड्रग्स विरोधी जनजागृती करून तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे असे आवाहन करण्यात येणार आहे. व्यसनमुक्तीसाठी मनसोपचार तज्ज्ञ मार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच शाळा, महाविद्यालयात व्यसनमुक्ती बाबत पोस्टर व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे. तर ज्याठिकाणी गांजा विक्री सुरु आहे, तसेच याबाबतचे अवैध धंदे जेथे सुरु आहेत त्याठिकाणी कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी विशेष पोलीस पथक नेमण्यात येणार आहे. यामध्ये आरोपीना अटक करून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे, या अभियानासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. कोल्हे यांनी केले.