दगडफेक करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी घेतले ताब्यात
कणकवली : हळवल गडनदी फाट्यावर तीन तरुणांनी एका ट्रकवर दगडफेक केली. या दगडफेकीचे कारण अद्याप समजले नाही. मात्र ट्रक मधील एकाच्या कानाला दगड लागल्याने कान रक्तबंबाळ झाला होता. याबाबत त्यांना ट्रकचालक यांनी विचारणा केली असता ” तो मी नव्हेच” अशी त्या तरुणांनी भाषा केली. शब्दाला शब्द होत बाचाबाची झाली. या घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्या तीन तरुणांकडे सर्वांनी बोट दाखवली तर ज्याला दुखापत झाली त्यांनीही आपण त्यांना दगड मारताना पाहिले असल्याचे सांगितले.
यावेळी कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी सहकारी पोलिसांच्या मदतीने त्या तीन तरुणांना कणकवली पोलीस ठाण्यात आणले. मात्र ज्यावेळी पोलीस त्या तरुणांना ताब्यात घेऊन गाडीत बसवत होते. त्यावेळी त्या तरुणांनी पोलिसांना देखील थेट नावचं घेत बघून घेईन अशा शब्दात इशारा दिला. त्या तरुणांची दिंडका थेट पोलीस ठाण्यात आणण्यात आली.
या प्रकरणी दुखापत झालेल्या तरुणाने कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी धाव घेतली. तक्रार नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. याबाबत अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.












