रत्नागिरी | प्रतिनिधी : सावकारी प्रकरणात निलेश किरच्या अन्य एका साथिदाराच्या शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या.बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता प्रकृती अस्वास्थामुळे त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
राजेंद्र बाळकृष्ण इंदुलकर (46,रा.कुवारबाव,रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे.त्याच्या विरोधात मंदार सुरेश सुर्वे (38,रा.कुवारबाव,रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.त्यानुसार,2021 मध्ये त्यांनी निलेश किर आणि राजेंद्र इंदुलकर कडून आपल्या आर्थिक अडचणीसाठी 1 लाख रुपये व्याजाने घेतले होते.त्यासाठी त्यांनी सहिचे बॉन्ड,कोरे चेक या दोघांना दिले होते.या रकमेची अधिक व्याजदराने त्यांनी 2 लाख 24 हजार 600 रुपयांची परतफेडही केली होती.परंतू,त्यानंतरही निलेश किर आणि राजेंद्र इंदुलकर मंदा सुर्वे यांच्याकडे आणखी 3 लाख 80 हजार रुपयांची मागणी करत होते.त्यासाठी त्यांना त्रास देउन ठार मारण्याची धमकी देत होते.
दरम्यान,मंदार सुर्वे यांनी या त्रासाला कंटाळून शहर पोलिस ठाण्यात या दोघांविरोधात तक्रार दिली होती.या प्रकरणात निलेश किरला या आधिच अटक करण्यात आलेली आहे.तर राजेंद्र इंदुलकरने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.सत्र न्यायालयाने त्याचा अर्ज नामंजूर केल्याने बुधवार 10 जानेवारी रोजी शहर पोलिसांनी राजेंद्रला अटक केली.










