न्यू हनुमान दिवटेवाडी आयोजित क्रिकेट स्पर्धा
राजापूर (वार्ताहर): शहरातील न्यू हनुमान दिवटेवाडी आयोजित आयपीएल धर्तीवरील प्रकाश झोतातील भव्य अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत बलाढय सुपर टायटन्स संघाला नमवत पॉवर हिटर्स राजापूर संघाने सुवर्ण महोत्सवी एन. एच. डी. चषकावर नाव कोरले.
या स्पर्धेत पॉवर हिटर्स संघाने सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपदाचा बहुमान पटकावला तर सुपर टायटन्सला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. दिवटेवाडी येथील गोठण मैदानावर ही स्पर्धा रंगली. या स्पर्धेत आठ संघांना प्रवेश देण्यात आला होता. आयपीएल धर्तीवर साखळी पध्दतीने ही स्पर्धा खेळविण्यात आली.
या स्पर्धेच्या अंतीम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पॉवर हिटर्स संघाने सुपर टायटन्सला सहा षटकात 51 धावांचे आव्हान दिले होते. मात्र पॉवर हिटर्सच्या भेदक गोलंदाजीमुळे जेमतेम 35 धावांपर्यंत सुपर टायटन्स मजल मारू शकला. हा सामना पॉवर हिटर्स संघाने लिलया जिंकत प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धेतील मॅन ऑफ दि सिरीज म्हणून अर्सलीन वाडेकर, मॅन ऑफ मॅच म्हणून विराज कदम, बेस्ट बॅटसमन म्हणून शहबाज पठाण, बेस्ट बॉलर म्हणून सलीम गडकरी तर बेस्ट फिल्डर म्हणून सोहम भाटकर याना निवडण्यात आले.
तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत नामवंत खेळाडुंनी आपल्या खेळाचे शानदार प्रदर्शन केले. तर क्रिकेटप्रेमी रसिकांनीही मोठी गर्दी केली. अत्यंत नेटके नियोजनात शिस्तबध्द रित्या स्पर्धा पार पडली.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी आमदार अॅड. सौ. हुस्नबानू खलिफे, सुर्वणकार व व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर यांच्या प्रमुख उपस्थीतीत पार पडले. प्रथम विजेत्या संघाला रोख रूपये 50 हजार तर उपविजेत्या संघाला रोख रूपये 35 हजार व मानाचा चषक देवून सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष गिरीष उर्फ गुडडू वादक, उपाध्यक्ष मनोज पवार यांच्या नेतृत्वाखाली मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी मेहनत घेतली.












