प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीत ६,५७,७७१ मतदार – जिल्हाधिकारी, किशोर तावडे
सिंधुनगरी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदार नोंदणी सुरू असून एक जानेवारी 2024 या अहर्ता दिनांकावर अठरा वर्षे पूर्ण करणाऱ्या नागरिकाला मतदान नोंदणी करता येणार आहे. आतापर्यंत 9349 नवं मतदारांनी नोंदणी पूर्ण केली आहे. त्यामुळे या जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघात मतदारांची संख्या घटली असून ६,५७,७७१ एवढी झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज दाखल होईपर्यंत मतदार नोंदणी सुरू राहणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी किशोर तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत गायकवाड जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदी उपस्थित होते.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २७ ऑक्टोंबर २०२३ ते २२ जानेवारी २०२४ या कालावधीत जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात तब्बल ९३४९ नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. तर १४५६७ मतदारांची वगळणी करण्यात आली आहे. वगळणी आणि नवीन नोंदणी मुळे जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या ६,५७,७७१ एवढी झाली असून यात ३,२८,३०३ पुरुष व ३,२९,४६८ महिलांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे नवीन मतदारांची नाव नोंदणीची प्रक्रिया सुरू असून नव मतदारांनी नाव नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी आज पत्रकार परिषदेत केले.
जिल्हाधिकारी दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे म्हणाले की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी २७ ऑक्टोंबर २०२३ ते २२ जानेवारी २०२४ या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम तसेच घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबवण्यात आली होती. या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात राबवण्यात आलेल्या मोहिमांमुळे अंतिम मतदार यादीत दुबार, स्थलांतरीत व मयत मतदारांची वगळणी करण्यात आली. ऑक्टोबर २०२३च्या प्रारूप मतदार यादीमध्ये ९३४९ नव मतदारांची नाव नोंदणी झाली. तसेच २३,९१६ मतदारांची वगळणी करण्यात आली. त्यामुळे अंतिम मतदार यादीमध्ये १४५६७ मतदारांची निव्वळ वगळणी (Net Deletion) करण्यात आली. तसेच सिंधुदुर्गात स्थलांतरीत झालेल्या मतदारांची नावे समाविष्ट होऊन एकूण मतदारांची संख्या ६,५७,७७१ इतकी झालेली आहे.
नवीन मतदार संख्येत वाढ
प्रारूप मतदारयादीत १८ ते १९ या वयोगटाची मतदार संख्या २४८२ होती, तर २० ते २९ वयोगटाची प्रारूप यादीतील मतदार संख्या ९८,५२५ होती. या पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये १८ ते १९ या वयोगटामध्ये मतदारांची ५७५६ मतदारांची.नव्याने भर पडली आहे. तसेच २० ते २९ या वयोगटातील १,०१,५२२ (१५.४३%) एवढे मतदार झाले आहेत. विविध सामाजिक संस्था, महाविद्यालये यांनी राबवलेल्या मतदार नोंदणी शिबिरांमुळे या वयोगटाच्या टक्केवारीत वाढ झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
आपले नाव यादीत आहे का हे प्रत्येकाने तपासावे
निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या ‘मतदाता सेवा पोर्टल या संकेतस्थळावर (https://electoralsearch.eci.gov.in/) जाऊन मतदाराने यादीत आपले नाव तपासावे आणि सर्व तपशील योग्य आहेत का हे पाहावे. सोबतच मतदान केंद्र सुद्धा तपासून घ्यावे, जेणेकरून ऐन मतदानाच्या दिवशी गैरसोय होणार नाही. तसेच यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी सहा क्रमांकाचा अर्ज भरून आपला मताधिकार सुनिश्चित करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने सर्व नागरिकांना करण्यात येत आहे.











