राजापूर अर्बन बँकेच्या मालवण शाखेचा भाजपा नेते निलेश राणे यांच्या हस्ते रविवारी शुभारंभ

राजापूर (प्रतिनिधी): शतकोत्तर परंपरा असलेल्या येथील राजापूर अर्बन को. ऑप बँकेच्या १३ व्या व सिंधुदुर्ग जिल्हयातील पाचव्या मालवण शाखेचा शुभारंभ रविवारी २८ जानेवारी रोजी भाजपा नेते व रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते होत आहे.

मालवण येथील वास्तु तथास्तु अपार्टमेंट, तळमजला, आदर्श नगर रेवतळे मार्ग या मध्यवर्ती ठिकाणी ही शाखा सुरू होत आहे. रविवारी सकाळी ११ वाजता निलेश राणे यांच्या हस्ते या शाखेचा शुभारंभ होणार आहे.

सर्वसामान्यांची जिव्हाळयाची बँक अशी ओळख असलेल्या व १०२ वर्षची परंपरा असलेल्या राजापूर अर्बन बँकेने सिंधुदुर्ग जिल्हयात यापुर्वी पडेल, वैभववाडी, तळेरे, कुडाळ या चार ठीकाणी आपल्या शाखा सुरू केल्या आहेत. त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता बँकेची मालवण येथे सिंधुदुर्ग जिल्हयातील ही पाचवी आणि बँकेची १३ वी शाखा सुरू होत आहे.

बँकेचे अध्यक्ष हनिफ मुसा काझी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या शुभारंभ प्रसंगी कणकवलीचे माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार अजित गोगटे, सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. याप्रसंगी बँकेच्या वतीने श्री सत्यनारायण महापुजेचेही आयोजन करण्यात आले आहे.
या शाखा शुभारंभ प्रसंगी बँकेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन बँकेचे उपाध्यक्ष प्रसार मोहरकर, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष अनिलकुमार करंगुटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे व मालवण शाखेचे शाखाधिकारी निलय हसोटीकर यांनी केले आहे.