शेतकरी महिलांचे मुलांसह खाडीपात्रातील पाण्यात तर पुरुषांचे ओरोस येथे आंदोलन
वेंगुर्ले l दाजी नाईक : शिरोडा वेळागर येथील अल्पभूधारक गरीब शेतकऱ्यांवर १९९० सालापासून झालेल्या अन्यायाविरुद्ध व ताज प्रकल्प संपादित क्षेत्रातून नऊ हेक्टर क्षेत्र वगळण्यासाठी शिरोडा वेळागर शेतकरी संघटनेच्यावतीने भूमिपुत्र शेतकऱ्यांनी आज २६ जानेवारी रोजी शिरोडा वेळागर येथील खाजण खाडीपात्रातील पाण्यात महिलांनी आपल्या कुटुब समवेत उभे राहून आंदोलन छेडले. तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ३५ ते ४० कुटुंबातील पुरुष सदस्यांनी आंदोलन छेडले असून एकाच वेळी दोन ठिकाणी आगळे वेगळे लाक्षणिक उपोषण आंदोलन छेडले आहे.
गेली तीस वर्ष वेळागरवासिय आपल्या न्याय हक्कासाठी लढा लढत आहेत. त्यांची घरे व शेती बाग बागायती यातूनच ३० ते ३५ कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र आज त्यांच्या सातबारा यामध्ये एमटीडीसी अशी शासनाची नोंद झाली आहे. ती नोंद रद्द करून पूर्ववत शेतकरी बागायतदार भूमिपुत्रांच्या नावाची नोंद करून द्यावी व शेतकऱ्यांना भूमीहिन होण्यापासून वाचवावे या मागणीसाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण व आंदोलन छेडले. विशेष म्हणजे या आंदोलनात लहान मुलांनीही सहभाग दर्शविला. यावेळी उर्मिला आदुलेकर, राजश्री आंदूलेकर, भाग्यश्री गवंडी, महिमा नाईक, कुमुदिनी गवंडी, शितल आरोसकर, वनिता आरोसकर, शारदा आरोसकर, संध्या रेडकर, रूपाली आरोसकर, प्रगती आरोसकर, दीपा आमरे, रश्मी डिचोलकर, शर्वाणी नाईक यासह अन्य महिला त्याचबरोबर विनोद आरोसकर वामन गवंडी संजय आंदूलेकर, महेश आदुलेकर, प्रदीप आरोसकर जगन्नाथ आदुर्लेकर यासह वेळागर वाडी येथील ३५ ते ४० कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.










