तीनवेळा राष्ट्रीय चित्रपट
पुरस्कार, राज्य शासनाकडून सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे प्रथम पुरस्कार ९ वेळा, ३ द्वितीय, आणि २ तृतीय असे तब्बल १४ राज्य चित्रपट पुरस्कार मिळवणारे मराठी चित्रपटांचे ऋषितुल्य दिग्दर्शक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्य सेनानी दत्तात्रय अंबादास मायाळू अर्थात मराठी चित्रसृष्टीचे लाडके दत्ताकाका म्हणजेच राजदत्तजी यांना नुकताच अत्यंत मानाचा पद्मभूषण पुरस्कार घोषित झाला. अवघ्या मनोरंजनसृष्टीसाठी ही एक अत्यंत आनंददायी घटना आहे. मराठी चित्रपट- नाट्यसृष्टीतील आजचे आघाडीचे दिग्दर्शक आणि कलर्स मराठीचे कार्यक्रम प्रमुख केदार शिंदे यांनी आदरणीय राजदत्त यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन पुष्पगुच्छ देऊन विनम्र अभिवादन केले.
“आदरणीय दिग्दर्शक राजदत्त यांचा भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने केलेला गौरव हा केवळ दत्ताकाकांचाच गौरव नसून संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टीचा तो गौरव आहे”, अशा भावना केदार शिंदे यांनी यावेळी व्यक्त केल्या. राजदत्त यांनी मराठी चित्रपटाला केवळ मनोरंजनाचे साधन मानले नाही तर कायम त्यांनी त्याकडे लोकशिक्षणाचे साधन म्हणून पाहिले आहे. त्यामुळेच त्यांच्या चित्रपटांनी कायमच वेगळा विचार मांडण्याचे काम सातत्याने केले. म्हणूनच राजदत्त नेहमीच आंम्हा चित्रकर्त्यांसाठी एक महत्त्वाचा आधारस्तंभ आणि खंदे मार्गदर्शक राहिले आहेत, असेही केदार शिंदे यांनी यावेळी सांगितले.












