सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आंबेडकरी चळवळीतील असंख्य कार्यकर्ते जाणार
कणकवली : अमळनेर येथे ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी सर्वसामान्य, शेतकरी, श्रमिक, महिला, दलित, आदिवासी तसेच बहुजन समाजाच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीला मुक्त विचारपीठ उपलब्ध करून देणारे १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन होणार असल्याची घोषणा विद्रोही साहित्य व सांस्कृतिक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली. या संमेलनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून असंख्य आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते जाणार आहेत.अशी माहिती सुदीप कांबळे यांनी दिली.
येथील धनदाई महाविद्यालयाच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्रोही साहित्य व सांस्कृतिक परिषद महाराष्ट्र राज्य अध्यक्षा प्रा.प्रतिमा परदेशी यांनी माहिती दिली. अमळनेरची भूमी ही पुरोगामी विचारांचा वारसा सांगणारी भूमी आहे. साने गुरुजी सारखे शेतकरी व कष्टकऱ्यांची भावना आपल्या साहित्यातून मांडणारे व कामगारांची आंदोलने उभी करणारे लेखक या भूमीत होऊन गेले.क्रांतिसिंह उत्तमराव पाटील, क्रांतीवीरांगणा लीलाताई पाटील यांची ही क्रांती भूमी आहे. शाहीर साबळेंसारख्या महाराष्ट्र शाहिरांची जडणघडण या मातीत झालेली आहे.त्यामुळे येथे हे संमेलन होत आहे.











