तहसील कार्यालयात पुरवठा विभागाच्या सेवांना गती 

एकाच दिवसात मिळत आहेत सेवा

सेवांमधील सुधारणा नागरिकांसाठी दिलासादायक

लाभार्थ्यांचा वेळ व खर्च दोन्हीची बचत

कणकवली : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाद्वारे पात्र लाभार्थ्यांना मिळणाऱ्या विविध सेवांमध्ये आता मोठी सुधारणा करण्यात आली आहे. पूर्वी या सेवांचा लाभ घेण्यासाठी आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागत होता तसेच नागरिकांना अनेकदा तहसील कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. मात्र, आता कणकवली तहसील कार्यालयाच्या माध्यमातून या सर्व सेवा केवळ एकाच भेटीत, एकाच दिवसात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

 

शिधापत्रिकेत नाव समाविष्ट करणे, नाव कमी करणे, नावामध्ये दुरुस्ती करणे, तसेच शिधापत्रिकेतील पत्त्यामध्ये बदल करणे अशा सेवा आता तत्काळ दिल्या जात आहेत. प्रशासकीय प्रक्रियेमध्ये करण्यात आलेल्या या सुधारणा लोकाभिमुख ठरत असून त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

 

एकाच दिवशी काम पूर्ण होत असल्याने नागरिकांचा वेळ, पैसा आणि येण्या-जाण्याचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. विशेषतः वयोवृद्ध व ग्रामीण भागातून येणाऱ्या लाभार्थ्यांना याचा मोठा फायदा झाला आहे.

 

या सेवांचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी केले आहे.

 

दरम्यान, कासार्डे येथील नागरिक विजय कोलते म्हणाले, “पूर्वी एका कामासाठी पाच-सहा वेळा तहसील कार्यालयात यावे लागत असे. मात्र, आता अर्ज दिल्याच दिवशी काम पूर्ण होत असल्याने आम्ही पुरवठा विभागाचे आभारी आहोत.”

 

ही सुधारणा नागरिकांना मोठा दिलासा देणारी ठरत असून, कणकवली तहसील प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे हे उदाहरण ठरले आहे.