मंत्री पदासाठी मागितलेले कोट्यावधी रुपये देऊ न शकल्याने मंत्रिपद नाकारले

मंत्री दीपक केसरकर यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

एक कोटीचा धनादेश दिल्याचाही दावा

कोकणी अस्मितेला हात घालाल तर पुन्हा कोकणी माणूस जागा दाखवेल

सावंतवाडी । प्रतिनिधी : माजी मुख्यमंत्री नारायण राणे ज्यावेळी शिवसेनेतून बाहेर पडले त्यावेळी त्यांच्यासोबत बाहेर पडलेल्या अकरा आमदारांपैकी श्याम सावंत वगळता दहा आमदारांना त्यांनी स्वतःच्या हिमतीवर निवडून आणले. मी देखील तुमच्यामुळे नाही तर सावंतवाडीच्या जनतेच्या प्रेमामुळे निवडून आलो. केवळ माझ्याच मतदारसंघात नाही तर जिल्ह्यात शिवसेनेचे मताधिक्य वाढविण्यात माझा हात असताना मला मंत्रिपद देण्यासाठी कोट्यावधी रुपयांची मागणी केली. त्यातील एक कोटीचा धनादेश मी दिला आहे मात्र उर्वरित रक्कम देऊ न शकल्याने मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी मला मंत्रिपद नाकारले असा हल्लाबोल मंत्री दीपक केसरकर यांनी केला.

सावंतवाडी येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे व आमच्यात तात्त्विक वाद होते. मात्र, मी त्यांना कधीही अपशब्द बोललो नाही. मात्र, उद्धव ठाकरे व त्यांचे सहकारी ज्या पद्धतीने व्यासपीठावरून जी टीका करीत आहेत ती कोकणची संस्कृती नाही. माझ्यावरही सावंतवाडीत येऊन खोके व गद्दार अशी टीका त्यांनी केली. ही टीका सावंतवाडीतील जनता मुळीच खपवून घेणार नाही. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत तुमच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त केले होते. त्यामुळे यापुढे कोकणच्या अस्मितेला हात घालाल तर पुन्हा कोकणी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेले नाते नेहमीच जपले आहे. मात्र तुम्ही त्यांच्यावर करीत असलेली टीका म्हणजे निव्वळ कृतघ्नपणा आहे. आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री असताना तुम्ही दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदी यांच्यासोबत बैठक घेऊन पुन्हा युतीमध्ये जाण्याचे कबूल केले होते. त्या घटनेचा मी साक्षीदार आहे. मात्र संजय राऊत यांनी शरद पवारांचे कान भरल्यानंतर तुम्ही घेतलेला निर्णय पवार यांनी सांगितल्यावर बदलला. त्यामुळे स्वतःच्या चुकीच्या निर्णयाचे खापर इतरांवर फोडू नका, असेही त्यांनी सांगितले.

‘तुम्ही साईबाबांची शाल आमच्या साहेबांच्या अंगावर घातलीत म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाले ‘ असे रश्मी ठाकरे यांनी मला जाहीर रित्या सांगितले होते. मात्र त्याच साईबाबांबाबत आज तुम्ही ज्या पद्धतीने वक्तव्य केले ते तुम्हाला निश्चितच फलदायी होणार नाही.साईबाबा मला एवढी शक्ती देतील की महाराष्ट्रसमोर मी तुम्हाला उघड पाडेन, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री असताना पाणबुडीसाठी निधी देऊ शकले नाहीत. मेडिकल कॉलेजचे श्रेय तुम्ही घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण ते आधीच मंजूर झाले होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या मतदारसंघात हजारो रोजगार निर्माण करणारा प्रकल्प आणला आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच मी देखील या जिल्ह्यासाठी करोडो रुपयांचा निधी आणला आहे. तुम्ही कोकणात येऊन केवळ टीका टिप्पणी व टोमणेबाजी करण्याचे काम करता तुम्ही मुख्यमंत्री असताना किंवा तुमचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे मंत्री असताना या जिल्ह्याच्या विकासासाठी एक रुपया तरी दिला का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.