महायुतीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध : रवींद्र चव्हाण

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढत असून शहरातील नागरीकांच्या गरजाही वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर शहराला २४ तास पाणीपुरवठा व्हावा यासाठी माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी पाठपुरावा केलेल्या नळपाणी योजनेचा आज शुभारंभ होत आहे. यासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून एकत्रीत प्रयत्न केले गेले. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ही योजना मंजूर झाली. आज या नळपाणी योजनेच्या लोकार्पणाचा कार्यक्रम होत आहे याचा आनंद आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महायुतीचे सर्व नेते एकत्रितपणे काम करीत आहोत. महायुतीच्या सरकारमुळे विकासाला गती येत आहे. हे सरकार सर्वसामान्यांच सरकार असून सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच पुढाकार घेऊ अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी दिली. सावंतवाडी जिमखाना मैदानावर आयोजित ५१ व्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ तसेच माजगाव धरण व सावंतवाडी नळपाणी योजनेचा शुभारंभ प्रसंगी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी ऑन लाईन उपस्थित राहत शुभेच्छा दिल्या.