सुगंधी वनस्पती प्रक्रिया सुविधा केंद्र हा एक अभिनव प्रोजेक्ट कणकवलीत सुरु : ना. नारायण राणे यांनी केले उद्घाटन

कणकवली : सुगंधी वनस्पती प्रक्रिया सुविधा केंद्र हा एक अभिनव प्रोजेक्ट आहे. सिंधुदुर्गात बेकारी होती असे म्हणतात. लोक आर्थिक दुबळे आहेत, असे म्हणायचे. याच्यावर मात करण्यासाठी जिल्ह्यात वेगवेगळे उपक्रम आणले. त्यात एम एस एम इ च्या माध्यमातून लेमन ग्रास सारखे अनेक छोटे – मोठे प्रकल्प आणि त्या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांना रोजगार निर्मिती करून दिली. लेमन ग्रास म्हणजे गवती चहा. गवती चहापासून अगरबत्ती, ऑइल, सुगंधी द्रव्य तयार करता येतील, असा महत्त्वाचा प्रोजेक्ट हरकुळ गावात सुरू झाला आहे. येथे गवती चहा नऊशे रुपये किलोने विकला जाणार आहे. किमान किलो मागे पाचशे रुपये फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे गवती चहाची मोठ्या प्रमाणात लागवड करा.असे आवाहन केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री ना. नारायण राणे यांनी केले.

येथे केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री ना. नारायण राणे व सौ. नीलमताई राणे यांच्या शुभहस्ते सुगंधी वनस्पती प्रक्रिया सुविधा केंद्राचा लोकार्पण सोहळा शनिवारी संपन्न झाला. कणकवली, गणेश नगर – मुडेडोंगरी येथे हे लेमनग्रास ऑईल डिस्टीलेशन केंद्र सुरु करण्यात आले. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयातंर्गत सुगंध आणि स्वाद विकास केंद्र, कन्नोज यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली हे केंद्र सुरु करण्यात आले. यावेळी आपली प्रगती करायला आपली इच्छाशक्ती फार महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी केले. यावेळी ना. नारायण राणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना ते म्हणाले, आपल्या कडच्या गवती चहाचा वैविध्यपुर्ण उपयोग आपल्याला कळला नव्हता, म्हणून त्याकडे दुर्लक्ष झाले होते. मात्र आता त्याकडे पहावं लागेल आणि ते करावं लागेल. तसेच गवती चहाला जगभर मागणी आहे. त्यापासून मोठ्या प्रमाणात औषध बनवली जातात. फणसाच्या बियांची देखील पावडर करून डायबेटीस या आजारावर त्याचा औषध म्हणून उपयोग केला जातो. जर्मनी सारख्या देशात मोठ्या प्रमाणावर याला मागणी आहे. कोकम, चिंचाच्या बियांपासून देखील औषध निर्मिती केली जाते. वेगवेगळे आजारांवर औषधे बनवलीजातात, असे यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

तर आपल्याला जो उद्योग व्यवसाय करायचा आहे त्याची रॉ. मटेरियल देखील आपल्याकडे उपलब्ध आहे. मात्र त्याचा आपल्याला उपयोग कसा करायचा हे कळत नसल्यामुळे आपण थोडेसे मागे आहोत. मात्र एम एस एम इ च्या माध्यमातून वेगवेगळी प्रशिक्षण देऊन अजून काही उद्योजक घडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री ना. नारायण राणे, सौ. निलमताई राणे, विनीत कुमारजी (सी ओ के व्ही आय सी), शक्ती शुक्लाजी, हेमंत सावंत, डॉ. मिलिंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.