आंबोलीत गुरे वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई

गोरक्षकांच्या प्रयत्नामुळे ८ गुरांना जिवदान

आंबोली । प्रतिनिधी : टेम्पो मधून कर्नाटकच्या दिशेने अनधिकृतपणे नेत असलेल्या आठ गुरांना गोरक्षकांच्या प्रयत्नांमुळे टेम्पो ताब्यात घेत पोलीसांनी मुक्त केले.आंबोली पोलीस तपासणी नाका येथे पहाटे सहा वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. गोरक्षक स्वागत नाटेकर आणि त्यांच्या मित्र मंडळाच्या प्रयत्नातून टेम्पोतून गुरांचे प्राण वाचवण्यास मदत झाली.

स्वागत नाटेकर हे नेहमीच गोरक्षणासाठी पुढे सरसावलेले असतात. गेली अनेक दिवस ते ज्या गाडीच्या मागावर होती ती गाडी आज शेवटी त्यांनी अथक प्रयत्नातून पकडली ही गाडी त्यांना मागेही दोन वेळा गुंगारा देत पळून गेली होती. पहाटे ( एम एच ०७ पी २२४४ ) या क्रमांकाच्या पिकअप टेम्पोमध्ये अतिशय अमानुष पद्धतीने आठ बैल भरण्यात आले होते. याबाबतची खबर स्वागत नाटेकर यांना मिळताच त्यांनी तात्काळ या गाडीचा पाठलाग करत आंबोली पोलीस तपासणी नाके यांना खबर दिल्यानंतर आंबोली पोलीस तपासणी नाक्यावर या गुरांसह गाडीसह जवळपास पाच लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस कॉन्स्टेबल मनीष शिंदे दीपक शिंदे , पोलीस दूधवाडकर, पोलीस पिरंनकर यांनी केली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून होत असलेल्या गो वश वाहतुकी बाबत वेळोवेळी प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले, मात्र शेतकऱ्यांच्या आडून हे अशा प्रकारचे गोरख धंदे करून सिंधुदुर्ग जिल्यातील गोधन कत्तलीसाठी नेणाऱ्यांचे मात्र प्रमाण कमी झाले नाही.
मागील काही दिवसापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणाशी संबंधित काहीजण देखील अशा गोरख धंदे करणाऱ्या सोबत असलेल्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने बघितले आहे. याबाबत भाजपा आमदार नितेश राणे यांनी जिल्हा नियोजन च्या सभे मध्ये विशेष लक्षवेधी मांडली होती. ही कारवाई करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी यांचे देखील आभार मानावे लागतील, असे यावेळी गोरक्षक स्वागत नाटेकर यांनी सांगितले.