सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५ रुपयांच्या ‘कोर्ट फी स्टॅम्प ‘चा तुटवडा

जनतेला बसतोय नाहक भुर्दंड

सावंतवाडी । प्रतिनिधी : न्यायालयीन व महसूल विभागातील कामकाजासाठी अत्यावश्यक असलेले ५ रुपयांचे कोर्ट फी स्टॅम्प सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेच उपलब्ध नसल्याने सर्वसामान्य जनतेसह वकील व या क्षेत्राशी निगडित व अन्य संबंधितांनाही त्याचा फटका बसत आहे. विशेष म्हणजे ५ रुपयांबरोबरच १ व २ रुपयांचे कोर्ट फी स्टॅम्प देखील उपलब्ध नसल्याने त्या जागी चक्क १० रुपयांचा स्टॅम्प वापरावा लागत असल्याने सर्वसामान्यांना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे.
कोषागार विभागाकडे मागील महिनाभरापासून हे कोर्ट फी स्टॅम्प उपलब्ध नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तर पाच रुपयाचे कोर्ट फी स्टॅम्प उपलब्ध नसल्याने त्याजागी दहा रुपयांच्या कोटी स्टॅम्प चा वापर होत असल्याने नजीकच्या काळात त्यांचादेखील तुटवडा भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याबाबत स्थानिक उप कोषागार अधिकारी मंदार पटवर्धन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत दुजोरा दिला. तर त्याबाबतची मागणी करण्यात आली असून या महिना अखेरपर्यंत मुंबईतून हे कोर्ट फी स्टॅम्प जिल्ह्यात उपलब्ध केले जातील, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.