रत्नागिरी : दरवर्षीप्रमाणे यंदाही फिनोलेक्स ॲकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी झाली.
व्यवसायाभिमुख शिक्षण तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान अवगत करताना विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्व आणि सांस्कृतिक मुल्याचे बीजारोपण करण्याच्या हेतूने अशा अनेक सांस्कृतिक उपक्रमांचे यशस्वी आयोजन फिनोलेक्स ॲकॅडमी वेळोवेळी करत आलेले आहे. शिवजयंतीच्या कार्यक्रमाची सुरुवात ही श्री देवी भगवती मंदिर-रत्नदुर्ग किल्ला येथून शिवज्योतीच्या मिरवणुकीने झाली. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हि शिवज्योत भगवती मंदिर -रत्नदुर्ग किल्ला, मारुती मंदिर, कोकण नगर ते फिनोलेक्स ॲकॅडमीच्या प्रांगणापर्यंत धावत आणली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद ,महाविद्यालयाचे इतर प्राध्यापक वृंद आणि उपस्थित विद्यार्थ्यांनी ढोल ताशाच्या गजरात आणि “छत्रपती शिवाजी महाराज कि जय” अशा घोषणांनी शिवज्योतीचे उत्साहात स्वागत केले. शिवज्योत आणि ग्रंथदिंडीची वाजत गाजत मिरवणूक कार्यक्रम स्थळी नेण्यात आली . कार्यक्रमस्थळी प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद, प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे भक्तिभावाने पूजन केले आणि दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या आरतीचे सामूहिक गायन केले. शिवाजी महाराजांच्या घोषणांनी आसमंत दणाणून सोडला.
शिवजयंतीचे औचित्य साधून शिवकालीन इतिहासाचे गाढे अभ्यासक प्रसिद्ध व्याख्याते श्री. श्रीनिवास पेंडसे ह्यांचे ‘स्वराज्य ते सुराज्य – शासनप्रणाली आणि व्यवस्थापन’ ह्या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद ह्यांनी शाल व श्रीफळ देऊन सर्वप्रथम व्याख्याते श्री. पेंडसे ह्यांचा सत्कार केला. शिवाजी महाराज हे फक्त गोष्टीरूप मर्यादित न ठेवता त्यांच्या उत्तम शासनप्रणालीमधून व्यवस्थापनाचे धडे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी गिरवले पाहिजेत,असे मत अनेक समकालीन उदाहरणे, प्रसंग तसेच पुरावे उपस्थित विद्यार्थ्यांसमोर मांडून श्री. पेंडसे ह्यांनी आपल्या जाज्वल्य वाणीने सर्वाना मंत्रमुग्ध केले. व्याख्यानानंतर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लाठी काठी, दांडपट्टा अशा मर्दानी खेळांचे प्रदर्शन करून उपस्थितांना स्वसंरक्षणाचा संदेश दिला. ह्या संपूर्ण कार्यक्रमात महाविद्यालयाच्या ढोल ताशा पथकाने आपल्या वादनाने सर्वांचा उत्साह वाढवला. कॉलेजच्या सांस्कृतिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सुमधुर भजनांनी शिवजयंतीच्या कार्यक्रमाची सांगता झाली. हा कार्यक्रम महाविद्यालयाची सांस्कृतिक सचिव कु गार्गी नागवेकर, विद्युत अभियांत्रिकी विद्यार्थी संघटन प्रमुख कु यशवर्धन जितकर आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाच्या सर्व शाखेच्या विद्यार्थी संघटनांनी उत्तमरीत्या पार पाडला. शिवजयंतीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी रांगोळ्या, पताका आणि झेंडे लावून महाविद्यालयाचे प्रांगण सुशोभित केले होते.
ह्या कार्यक्रमासाठी फिनोलेक्स ॲकॅडमीचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद आणि रजिस्ट्रार श्री. गजानन तारगावकर ह्याचे विशेष सहकार्य लाभले. महाविद्यालयाचे विद्युत अभियांत्रिकी शाखेचे विभागप्रमुख डॉ. जयंत माने, प्रा. मिलिंद तगारे आणि विद्युत अभियांत्रिकी विद्यार्थी संघटनेचे शिक्षक-प्रमुख प्रा. निखिल कासार ह्यांनी विशेष मेहनत घेतली.












