महामार्गावर बंदावस्थेतील वाहनांमुळे अपघातांमध्ये वाढ

रस्त्याच्या मध्यभागी बंद पडताहेत अवजड वाहने,

खेड(प्रतिनिधी) मुंबई – गोवा महामार्गावरील खवटीपासून परशुराम घाटापर्यंतच्या चौपदरीकरणामुळे वाहनचालकांचा प्रवास सुस्साट झाला असला तरी भर रस्त्यातच बंद पडणाऱ्या अवजड वाहनांमुळे अपघातांचा धोका कायम आहे. बंदावस्थेतील वाहनांवर ये-जा करणारे दुसरे वाहन आदळून दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील अवघड वळण अपघाताच्या दृष्टीने शापितच बनले आहे. या अवघड वळणावर विशेषतः अवजड वाहनांना सातत्याने घडणाऱ्या अपघातांमुळे वाहनचालकांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. याठिकाणी सातत्याने घडणारे अपघात रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खाते टायर तंत्रज्ञानाचा अवलंबलेला मार्गही फोल ठरला आहे. याशिवाय अपघात रोखण्यासाठी १६ हून अधिक गतिरोधक बसवून देखील अपघात थांबेनासे झालेआहेत.दोनच दिवसापूर्वी भोस्ते घाटात बंद पडलेल्या टँकरला दोन दुचाकी मागून धडकल्याने दोघे दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाले होते. त्या दोघांवरही शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.