पुरातत्व अभ्यासक डॉ. अंजय धनावडे यांच्या भेटीने वाढल्या स्थानीकांच्या अपेक्षा
मंडणगड | प्रतिनिधी : मंडणगड तालुक्यातील बोरखत, गोठे, धामणी, व वेरळ या चार गावांच्या सिमांवर गोठे या ठिकाणी असलेल्या कातळ शिल्पांचे रहस्य याकरिता आवश्यक असलेला अभ्यास सुरु झाल्याने लवकरच जगासमोर येणार आहे. स्थानीक प्रसार माध्यमांनी कातळ शिल्पाचे अस्तित्वा संदर्भातील माहीती प्रसिध्द करताच संशोधक व अभ्यासकांना या शिल्पाचा अभ्यास करण्याचा ध्यास घेतला आहे. राज्यातील विविध ठिकाणचे अभ्यासक या ठिकाणास भेट देत आहेत. 25 फेब्रुवारी 2024 रोजी कोकण इतिहास परिषद रायगड जिल्हा अध्यक्ष व पुरातत्व अभ्यासक डॉ. अंजय धनावडे यांनी या ठिकाणी भेट देत शिल्प व परिसराचा संशोधनाचे दृष्टीने अभ्यास केला. यावेळी शिल्प व इतिहास प्रेमी अँड. धनजंय करमरकर, जितेंद्र दवंडे, विनोद जाधव व स्थानीक ग्रामस्थही उपस्थित होते. डॉ. अंजय धनावडे यांनी अभ्यासाकरिता आवश्यक छायाचित्रण आणि सदर शिल्पांची मोजमापे घेत करत परिसराची पाहणी केली. यानिमीत्ताने त्यांच्याकडून मिळालेल्या माहीतीनुसार चार गावांच्या सीमेवर आढळून आलेले कातळ शिल्प खूपच इंटरेस्टिंग आहेत. शिल्पाचा तोंडाकडचा भाग भग्न झालेला असल्याने सड्यावर कोरण्यात आलेला प्राणी डुक्कर किंवा गेंडा असण्याची शक्यता आहे. कातळ शिल्पे ही कोकणात फक्त जांभ्या सड्या वर आढळून आलेली आहेत. कोकणात आढळणारी कातळ शिल्पे अश्मयुगीन काळातील असून त्यांचा कालखंड मध्याशम्युगीन असून वर्तमान काळापासून सुमारे तीन हजार वर्षापासून ते दहा हजार वर्षे इतका जुना असतो असे अभ्यासकांचे मत आहे.
आता पर्यंत पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय विभाग महाराष्ट्रशासन, कोकण इतिहास परिषद, निसर्गायात्री संस्था, देवग ड इतिहास अभ्यास मंडळ आणि काही स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून अनेक कातळ शिल्पे अद्याप पर्यंत उघडकीस आलेली आहेत.
मात्र अद्याप पर्यंत मंडणगड तालुक्यामध्ये कातळ शिल्पांची नोंद झालेली नव्हती या दृष्टीने सावित्री नदीच्या दक्षिण काठावर असलेल्या गावातील सड्या वर हे उल्लेखनीय शिल्प आढळून आल्याने अभ्यासाला एक वेगळी दिशा मिळणार आहे. ज्या वेळेस माणूस शिकारी अवस्थेत होता व तेव्हा तो भटक्या वृत्तीचा होता शिकार करणे व अन्न संकलन करणे ही प्रामुख्याने त्याची जीवन जगायची पद्धत होती. त्या काळात त्यांच्या बुध्दीचा आवका व त्यावेळी उपलब्ध साधनाच्या आधाराने सदर चित्रे त्यांनीं कोरली. हे कातळ शिल्प आढळून आल्याने मंडणगड तालुक्याचे नावही कातळ शिल्पांमध्येही कोरले गेले आहे अशाच पद्धतीची या परिसरात आणखीन कातळशिल्पे असण्याची शक्यता आहे त्याचा शोध घेणे सुरु आहे. सखोल व परिपुर्ण अभ्यासा नंतर या संदर्भात आणखीन माहीती देता येईल असे डॉ. अंजय धनावडे यांनी या निमीत्ताने सांगीतले. तसेच याचबरोबर शिल्प पाहण्यासाठी या ठिकाणी येणाऱ्यांची संख्या दिवसागणीक वाढणार असल्याने आगामी काळात मानवी हस्तक्षेपाचे प्रमाण वाढल्याने या शिल्पाचे अधिकचे नुकसान होणार नाही या करिता संरक्षक उपाय करण्याच्या सुचनाही दिल्या आहेत.











