मालवण शहरात 22 विकासकामे मंजुर

पालककमंत्री रवींद्र चव्हाण यांची शिफारस : भाजप नेते निलेश राणे यांचे विशेष प्रयत्न : विजय केनवडेकर यांनी दिली माहिती 

मालवण | प्रतिनिधी : पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शिफारशी नुसार नगरोथांन व जिल्हा नियोजन विशेष निधीतून 22 विकास कामे मालवण शहरांमध्ये मंजूर झाली असून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. भाजप मालवण कुडाळ विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी विशेष प्रयत्न करून हा निधी उपलब्ध करून घेतला आहे.

 

त्याबद्दल पालकमंत्री रवींद्र चव्हाण व निलेश राणे यांचे भारतीय जनता पार्टी मालवण शहराच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहेत. अशी माहिती भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा मालवण शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी दिली आहे.

 

मालवण शहरांमध्ये जनतेला आवश्यक असणारी विकास कामे भारतीय जनता पार्टी मार्फत महायुतीचे सरकार आल्यानंतर कार्यान्वित करण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न केले जात आहेत. यासाठी आवश्यक असणारी शासकीय कागदपत्रे, पाठपुरावा भारतीय जनता पार्टी मार्फत करण्यात आला आहे.

प्रशासकीय अधिकाऱ्यांची विशेष बैठक पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या कक्षात घेऊन या संदर्भात मालवण शहरातील होणारी कामे ही दर्जेदार झाली पाहिजे. तसे न झाल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट आदेश पालकमंत्री यांनी दिले होते.

मालवण शहरातील विकास कामे मीच मंजूर केली असे भासवण्याचा प्रयत्न विरोधी पक्षातील काही माजी नगरसेवक करताना निदर्शनात येत आहेत. ॲडव्हान्स तांत्रिक मंजुरी करून घेणे म्हणजे विकास काम मंजूर करणे असे होत नाही. असे करून विकास कामे मीच आणले असे भासवण्याचा प्रयत्न विरोधी माजी नगरसेवक करताना निदर्शनास येत आहे. ठेकेदारांना धरून अशा प्रकारची कामे कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रयत्न झाल्यास यासंबंधी लेखी तक्रार पालकमंत्री यांच्याकडे भारतीय जनता पार्टी मार्फत करण्यात येईल. असे केनवडेकर यांनी सांगितले.

 

कलादालनासाठी निधी उपलब्ध होणार

 

मालवणात अत्याधुनिक असे ऐतिहासिक कलादालनासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत तीन कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याचा पालकमंत्री यांनी शब्द दिला आहे. यासंबंधी मालवण नगरपालिका प्रशासन व पालकमंत्री यांची बैठक संपन्न झाली आहे. या संदर्भातही पाठपुरावा भाजपा मालवण शहर करीत आहे. राजकोट किल्ला व छत्रपतीचा पुतळ्याजवळील नागरी सुविधांसाठी पर्यटन विभागामधून वेगळा निधी जिल्हा नियोजन मध्ये मंजूर करून देण्यासाठी निर्देश पालकमंत्री यांनी दिले आहेत. असेही विजय केनवडेकर यांनी सांगितले.