महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्याबरोबरच समाजातील ओळख अधोरेखित करण्यासाठी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात माध्यमिक विद्यालय नाटळ येथे साजरा करण्यात आला. महिला प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. महिलांच्या या कार्याला सलाम करण्यासाठी व विद्यार्थ्यांमध्ये या महिलांच्या कार्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विद्या समिती अध्यक्षा सौ. उमा भालचंद्र सावंत यांच्या संकल्पनेतून डॉ. सीमा राव, इंदू मल्होत्रा, अरुणा रेड्डी, अवनी चतुर्वेदी, गीता गोपीनाथ, अरुणिमा सिन्हा, पी. व्ही. सिंधू, अवनी लेखारा, नैना जयस्वाल, कोनेरू हम्पी या भारतातील विविध क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजाविणाऱ्या महिलांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकत इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी उत्कृष्टपणे सादरीकरण केले. महिला दिनाचे महत्त्व तसेच महिला दिन साजरा करण्यामागचा उद्देश प्रशालेच्या सहशिक्षिका श्रीम. प्रणिता बांबुळकर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
ग्रामीण भागातील महिलांनी आपल्या पाककलेतील कला गुण विकसित करावे या उद्देशाने महिला पालकांसाठी प्रशालेच्या वतीने पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महिला पालकांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आपली पाककला सादर केली. यामध्ये प्रथम क्रमांक सौ. ज्योती प्रकाश सावंत , द्वितीय क्रमांक सौ. प्रतीक्षा प्रशांत चव्हाण तर तृतीय क्रमांक सौ. साक्षी मुकुंद सांगवेकर यांनी पटकाविला. स्पर्धेसाठी सौ. ईशांका नेवाळकर या परीक्षक म्हणून लाभल्या . महिला पालकांमधून सौ.गावकर व सौ.नेवाळकर उपस्थित होत्या. विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. तसेच परीक्षक व सहभागी स्पर्धकांना देखील भेटवस्तू देण्यात आल्या. याप्रसंगी मुख्याध्यापक श्री.सी.टी तांबे यांनी महिलांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. ह्या प्रसंगी प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर वृंद उपस्थित होते. या उपक्रमाचे संस्था अध्यक्ष श्री. भालचंद्र सावंत, शालेय समिती चेअरमन श्री. नितीन सावंत व सर्व संस्था पदाधिकारी यांनी कौतुक करत शुभेच्छा दिल्या.












