नाणोस गावात राजरोस फिरणाऱ्या बिबट्यांचा बंदोबस्त करा 

 

सरपंच प्राजक्ता शेट्ये यांचे वनविभागाला निवेदन 

न्हावेली । प्रतिनिधी : नाणोस गावात बिबट्या राजरोसपणे फिरत असून त्याचा स्थानिकांना तसेच गुरांना वन्य प्राण्यांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे मुक्त संचार करणाऱ्या या बिबट्यांचा त्वरीत बंदोबस्त करा, अशी मागणी नाणोस ग्रामपंचायत सरपंच सौ.प्राजक्ता शेट्ये यांनी वन विभागाकडे केली आहे.

या बाबतचे निवेदन त्यांनी वनविभागाला सादर केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्रीपाद ठाकूर, वासुदेव जोशी, बाबल ठाकूर, उमेश शेट्ये आदी उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की, नाणोस गावात सध्या संध्याकाळ झाल्यानंतर लोकवस्तीतील घरांशेजारी बिबट्याचा ओरडण्याचा आवाज येतो. काही लोकांच्या तो निदर्शनासही आला आहे. लगतच्याच आडगाव गावात भरवस्तीत बिबट्यांचा वावर दिसून आला आहे. त्यामुळे गावातील नागरिक भयभीत असून काजू हंगाम सुरु असल्याने बागायतीत जाण्यास भिती निर्माण झालेली आहे.

तसेच सदर बिबटा हा रात्री भरवस्तीत भक्ष्याच्या शोधात फिरत असून सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. ग्रामसभेत ग्रामस्थांनी पिंजरा लावण्याबाबत मागणी केलेली आहे. तरी भर लोकवस्तीत मुक्त संचार करणाऱ्या बिबट्यांची गांभिर्याने दखल घेऊन त्वरित पिंजरा लावून बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. या बाबत येत्या दोन दिवसांत पिंजरा लावू असे आश्वासन वनधिकारी गाड यांनी दिले.