गुहागर l प्रतिनिधी :महाराष्ट्र राज्यात सध्या सुरु असलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियाना अंतर्गत झालेल्या स्पर्धेमध्ये शासकीय शाळा या गटात जिल्हा परिषद आदर्श शाळा शिवणे नं. 2 या शाळेने गुहागर तालुक्यातून तृतीय क्रमांक पटकावत रोख एक लाख रुपयाच्या बक्षिसाची शाळा मानकरी ठरली आहे.
1 जानेवारी 2024 ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा , सुंदर शाळा हे अभियान राबविण्यात आले. या अभियाना अंतर्गत शाळांचे १०० गुणांचे मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग आणि शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग या अंतर्गत शाळा परिसराचे सौदार्यीकरण , विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमातील , व्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेतील सहभाग , शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्व विकासाठी आवश्यक अवांतर उपक्रम , शाळेची इमारत व परिसराची स्वच्छता , राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देण्याबाबतचे उपक्रम , विविध क्रीडास्पर्धांचे आयोजन, आरोग्य, आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास , तंबाखू मुक्त शाळा, प्लास्टिक मुक्त शाळा , शाळा व्यवस्थापन समितीने आयोजित केलेले उपक्रम या सर्व मुद्यांच्या आधारे शाळांचे मुल्यांकन करण्यात आले.
या सर्व घटकांमध्ये शाळेने उत्तम प्रदर्शन करत गुहागर तालुक्यातून शासकीय शाळा या गटात तृतीय क्रमांक पटकाविला. या सर्व यशाच्या मागे शाळेचे मुख्याध्यापक आदर्श शिक्षक दिनेश काशिनाथ जाक्कर यांचे उत्तम नियोजन आणि मुद्देसूद केलेली मांडणी, उपशिक्षक नवनाथ धुळगंडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनस्वी महेंद्र ठोंबरे, उपसरपंच सदानंद रामचंद्र जोशी, तंटामुक्ती अध्यक्ष शंकर जानू जोशी, सर्व शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थ यांचे लाभलेले सहकार्य यामुळे हे यश संपादन केले आहे. हे सर्व करण्यासाठी पाचेरी आगर केंद्राचे केंद्रप्रमुख विश्वास सुकलाल खर्डे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल सर्वांनी शाळेचे अभिनंदन केले आहे.












