रत्नागिरी सिंधुदुर्गचा एकच निर्धार, विनायक राऊत हद्दपार…

भाजप पदाधिकारी विजय केनवडेकर, धोंडी चिंदरकर यांचा हल्लाबोल

सिडकोची अधिसूचना रद्द झाली असताना खा. विनायक राऊत यांनी नौटंकी थांबववावी : दिला सल्ला

मालवण | प्रतिनिधी : कोकणातील काही गावे सिडकोकडे देण्याचा घेतलेला निर्णय स्थानिक भूमिपुत्राना अमान्य असल्याने मंत्रिमंडळाच्या बैठकीत रद्दबातल करण्यात आला आहे. त्याबाबतचा जीआर देखील प्रसिद्ध करण्यात आला असताना आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उबाठा गटाचे खासदार विनायक राऊत हे सिडकोचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलनाची भाषा करीत आहेत. आजपर्यंतच्या प्रत्येक निवडणुका ठाकरे गटाने जनतेची दिशाभूल करूनच जिंकल्या आहेत. आता देखील तेच प्रकार सुरु असून यांची नौटंकी आता जनतेने ओळखली आहे. आजपर्यंतच्या दहा वर्षात येथील स्थानिक आमदार, खासदार हे निष्क्रिय ठरले असून आता आगामी लोकसभा निवडणुकीत “रत्नागिरी सिंधुदुर्गचा एकच निर्धार, विनायक राऊत हद्दपार” ही मोहीम नागरिकांच्या वतीने राबवली जाणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय केनावडेकर आणि तालुकाद्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

भाजपाच्या मालवण कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, राजन गावकर, महेश मांजरेकर, आबा हडकर, बाबा मोडकर, दीपक पाटकर, निलेश खोत, संतोष गांवकर यांच्यासह अन्य उपस्थित होते.

सिडको चा निर्णय आल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. हे माहीत असताना देखील केवळ राजकीय दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून खासदार विनायक राऊत हे जनतेमध्ये नाहक गैरसमज पसरवण्याचे काम करत आहेत. आजपर्यंतत उबाठाने प्रत्येक प्रकल्पावरून नागरिकांना भडकवून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचे काम केले. या दहा वर्षात विकासाचे एकही ठोस काम करण्यात खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक हे अपयशी ठरले आहेत. केवळ जनतेची दिशाभूल करून मते मिळवणे हाच अजेंडा त्यांनी राबविला आहे. वैभव नाईक यांनी आमदारकीच्या निवडणुकीत स्थानिक मच्छीमारांच्या किनारपट्टीवरील वस्त्या कोळीवाड्यात रूपांतरीत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र याबाबत कोणताही पाठपुरावा त्यांनी केला नाही. किनारपट्टी भागाला सीआरझेडचा प्रश्न भेडसावत आहे याबाबत खासदार विनायक राऊत यांनी हा कायदा बदलण्यासाठी दिल्लीत किती वेळा बैठका घेतल्या हे जाहीर करावे असे सांगून खासदार विनायक राऊत खऱ्या अर्थाने नशीबवान आहेत. त्यांच्या खासदारकीच्या पहिल्या टर्ममध्ये सुरेश प्रभूू हे राज्यसभेचे खासदार आणि केंद्रात मंत्री होते तर दुसऱ्या टर्म मध्ये नारायण राणे राज्यसभेचे खासदार आणि केंद्रात मंत्री होते. त्यामुळे या दोघांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे झालेल्या विकासकामांना स्थानिक खासदार म्हणून स्वतःचे लेबल लावण्याचे काम विनायक राऊत यांनी केले, असे विजय केनवडेकर आणि धोंडी चिंदरकर यांनी म्हटले आहे.

बाबा मोंडकर यांची ठाकरे गटावर टीका

बाबा मोडकर यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने राऊत हटाव आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग बचाव मोहीम येत्या काळात भाजपच्या वतीने राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच ठाकरे गटावर आमदार वैभव नाईक, खा. विनायक राऊत यांच्या कारभारावर जोरदार टीका केली.