केर गावात हत्तीनी रस्त्यावरच ठाण मांडल्याने ग्रामस्थ भयभीत

 

दोडामार्ग (प्रतिनिधी) : केर गावात पुन्हा हत्तीचा उच्छाद सुरू झाला आहे. केर घोडगेवाडी रस्त्यावर शुक्रवारी सकाळी हत्ती व तिचे पिल्लू रस्त्यावरच ठाण मांडून होते. वाहन चालकांची या प्रसंगामुळे घबराट उडाली. आरडाओरड केल्यानंतर हत्ती व पिल्लू लगतच्या काजू बागायतीत गेले. वनविभागाने हत्ती हटाव मोहीम तातडीने हाती घ्यावी, अशी मागणी स्थानिक ग्राममस्थांमधून होत आहे.

महिन्याभराच्या विश्रांतीनंतर टस्कर व पिल्लू याचे चार दिवसापूर्वी केर गावात आगमन झाले. त्यानंतर त्यांनी परिसरात नुकसानीचे सत्र सुरू केले आहे. सध्या काजू हंगाम सुरू असून शेतकरी काजू बागायतीत असतात. मात्र हत्तीच्या आगमनामुळे केर पंचक्रोशीत काजू बागायतदारांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. वन विभागाशी संपर्क न झाल्याने नुकसानीची माहिती प्राप्त झालेली नाही.

ग्रामस्थांना काजू बागायती निर्धोकपणे बाहेर पडता यावे यासाठी वन विभागाने तात्काळ हत्ती हत्या मोहीम हाती घ्यावी अशी मागणी केर गावचे माजी सरपंच तथा शिवसेना जिल्हा समन्वयक प्रेमानंद देसाई यांनी केली आहे.