कोकण कला व शिक्षण विकास संस्थेला कम्युनिटी इम्पॅक्ट एक्सलन्स राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा

बांदा (प्रतिनिधी) :    उत्कृष्टता आणि नेतृत्वाची ओळख म्हणून प्रसिद्ध असलेल्या हैद्राबाद, तेलंगाना येथील बिझनेस मिंटने आजपर्यंत अनेक उद्योजक, महिला, तंत्रज्ञान आणि समाजसेवी संस्थांना प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे. बिझनेस मिंटने या वर्षीच्या राष्ट्रीय पुरस्कारांच्या घोषणेत कम्युनिटी इम्पॅक्ट एक्सलन्स अवॉर्ड २०२४ या पुरस्कारासाठी कोकण कला व शिक्षण विकास संस्थेची निवड केली आहे. हैद्राबाद येथे संस्थेला सन्मानचिन्ह आणि सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात येणार आहे.

 

सर्जनशीलता, दृढता, सामाजिक बांधिलकी आणि उल्लेखनीय कामगिरीची कृतज्ञता म्हणून बिझनेस मिंटने कोकण विकास संस्थेला सन्मानित करत असल्याचे आपल्या नेशन वाइड अवॉर्डच्या संकेत स्थळावर अधोरेखित केले आहे.

 

कोकण संस्थेचे तळागाळातील काम उल्लेखनीय असून संस्थेने आतापर्यंत लाखो लोकांना आपल्या माध्यमातून मदत पोहचविली आहे. संस्था गेली १३ वर्षे महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, दिल्ली, तामिळनाडू आणि तेलंगणा सारख्या अनेक राज्यात काम करत आहे. संस्थेच्या कामाची दखल २०२३ मध्ये राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली होती. ज्यात बेंगलोर येथे कम्युनिटी डेव्हलपमेंट अवॉर्ड तर दिल्ली येथे बेस्ट एनजीओ ऑफ द ईअर २०२३ अशा दोन राष्ट्रीय पुरस्कारांनी संस्थेला सन्मानित केले आहे. कम्युनिटी इम्पॅक्ट एक्सलन्स अवॉर्ड हा सन्मान म्हणजे संस्थेच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला आहे. तसेच संस्था करत असलेल्या उत्कृष्ट कामाची ही पोचपावती असल्याची भावना संस्था अध्यक्ष दयानंद श्रीराम कुबल यांनी व्यक्त केली.