दोन संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी | प्रतिनिधी : किरकोळ कारणातून अपंग मुलगा आणि त्याच्या वडिलांना लाकडी दांडका आणि लोखंडी फाईटने मारहाण केल्याप्रकरणी दोन संशयितांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवार 30 मार्च रोजी सायंकाळी 7 वा. सुमारास धनजीनाका येथील टिकेकर हॉटेलच्या बाजुला घडली.
निहिर वारंग, राहुल गावडे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात सचिन पांडुरंग वायंगणकर (46,रा.मसुरकरवाडी जयस्तंभ,रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, शनिवार 30 मार्च रंगपंचमीच्या दिवशी पत्नी सुवर्णा,मुलगी गायत्री अपंग मुलगा रायसू यांना भैरी देवाची पालखी दाखवण्यासाठी धनजीनाका येथे गेले होते. त्यावेळी रायसू अपंग असल्याने त्याला दुचकीवर बसून ते धनजीनाका येथील चढावाच्या ठिकाणी देवाचे दर्शन घेण्यासाठी गेले होते.
त्यावेळी संशयित निहिर वारंग आणि राहुल गावडे यांनी तिथे येत अज्ञात कारणातून रायसूची मान धरुन त्याला खाली पाडले. ही बाब त्याची बहिण गायत्रीला समजताच तिने दर्शनासाठी गेलेल्या आपल्या वडिलांना जाउन सांगितले. ते धावत रायसू जवळ गेले असता दोन्ही संशयितांनी सचिन वायंगणकर यांना शिवीगाळ करत धामापूरकरदुकानाच्या गल्लीत नेले. त्यानंतर निहिर वारंगने लाकडी दांडक्याने सचिन वायंगणकर यांच्या उजव्या हातावर मारुन दुखापत केली. दरम्यान त्यांचे भांडण सोडवण्यासाठी मध पडलेल्या संकेत चव्हाणला राहुल गावडेने लोखंडी फाईटने डाव्या डोळ्याच्या खाली मारुन दुखापत केली. याप्रकरणी संशयितांविरोधात भादंवि कायदा कलम 324,323,504,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











