दरात १५ टक्क्यांनी वाढ
खेड(प्रतिनिधी) जिल्ह्यात कडाक्याच्या उन्हात थंड पाण्याने दिलासा देणारे मातीचे माठ बाजारात दाखल होत आहेत. विविध आकारांच्या माठांना मोठी मागणी आहे. यंदा त्यांच्या किंमतीत १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कुलर, एसी, फ्रिजचा जमाना असला तरी नैसर्गिक थंडगार पाणी देण्याचे साधन म्हणून मातीच्या माठाचा वापर आजही शहरासह ग्रामीण भागात होत आहे. माठ खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे.
महागाईच्या काळात आता माठाच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रत्येक माठावर १५ ते २० रुपयांनी वाढ झाली आहे. बाजारात १०० ते २५० रुपयांपर्यंत माठ विक्रीस उपलब्ध आहेत. परंतु किमती पाहून अनेक जण लहान माठ खरेदी करत आहेत. यामध्ये काळ्या माठाला जास्त मागणी आहे. त्याच्या किंमती १०० ते १२५ रूपयांच्या पुढे आहेत. तर नळ असलेला माठांना मध्यमवर्गीयांची विशेष पसंती असून ते ६५ ते १०० रुपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. राजस्थानी लाल माठांच्या किंमती कलाकुसर असल्याने शंभर रूपयांच्यापुढे आहेत.
काही वर्षांपूर्वी ३० ते ४० रुपयाला मातीचा मोठा माठ मिळत असे, आता त्याच माठाची किंमत १०० ते १५० रुपये आहे. मातीपासून माठ बनवण्याचा परंपरागत व्यवसाय कुंभार समाज करतो. परंतु अलिकडे महागाई वाढली आहे. आता माती विकत घ्यावी लागत आहे. माती आणण्यासाठी तहसील कार्यालयाची परवानगी घ्यावी लागते. त्यानंतर माठ तयार करून ते बाजारात विकावे लागतात. पारंपरिक पद्धतीने माठ तयार करण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागते. कच्च्या मालात मातीसाठी टॅक्टरच्या एका ट्रॉलीसाठी दीड ते दोन हजार रुपये मोजावे लागतात. तयार केलेल्या माठांना भाजण्यासाठी जळणाचे लाकूड पाच रुपये किलोप्रमाणे घ्यावे लागते. माठ बनवण्यासाठी लागणारी मेहनत आणि खर्च हे भाववाढीमागील मुख्य कारण आहे.









