खेडमधील नुकसानग्रस्तांची होतेय चेष्टा !

मार्चअखेरीस ८४ पूरग्रस्तांना ३९ लाख ८१ हजार ७८७ रुपयांची भरपाई 
खेड (प्रतिनिधी)
शहरात गत वर्षीच्या पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होऊन व्यापाऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले होते. मात्र, अद्याप ५० टक्केदेखील नुकसान भरपाई देण्यात आलेली नसून मार्चअखेरीस सरकारने ८४ व्यापाऱ्यांच्या खात्यात ३९ लाख ८१ हजार ७८७ रुपये इतकी रक्कम देऊन त्यांची चेष्टा केली आहे.
खेडमध्ये दि. १९ जुलै २०२३ रोजी अतिवृष्टी झाल्यामुळे जगबुडी व नारिंगी नदीच्या पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे नदी किनाऱ्यावरील खेड शहराला पुराचा फटका बसला. त्यामध्ये शासकीय पंचनाम्यानुसार ३९० जणांचे १ कोटी ५९ लाख ३४ हजार ५७५ रुपयांचे नुकसान झाले. सरकारने झालेल्या पंचनाम्यानुसार प्रत्येकी नुकसान भरपाई मदत म्हणून पंचनाम्यात नमूद रक्कमेच्या ७५ टक्के किंवा जास्तीत जास्त ५० हजार रुपये प्रत्येकी देणार असल्याचे जाहीर केले. परंतु, प्रत्यक्षात या मार्च अखेर पर्यंत ३९० पैकी केवळ ८४ जणांना ३९ लाख ८१ हजार ७८७ रुपये देण्यात आले आहेत.
जुलै २०२३ मध्ये अतिवृष्टीत नुकसान झालेल्या ३०९ जणांचे १ कोटी १९ लाख ५२ हजार ८८८ रुपये अद्याप मिळालेले नाहीत. ही रक्कम नक्की केव्हा मिळेल हे देखील शासकीय यंत्रणा सांगू शकत नसल्याने पूरग्रस्तांतून नाराजी व्यक्त होत आहे.