लोकसभा निवडणुकीत देशात फिर एक बार मोदी सरकार ; केंद्रीय मंत्री नारायण राणे व्यक्त केला ठाम विश्वास

मालवण येथील कार्यकर्ता मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोकणी माणूस हे माझे कुटुंब : केंद्रीय मंत्री नारायण राणे

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक जिंकायची आहे आणि गाजवायची आहे : भाजप नेते निलेश राणे

अमित खोत | मालवण : कोकणी माणूस, येथील सर्व सहकारी हे माझे कुटुंब आहे. महाराष्ट्रासह देशात दहा प्रमुख पदावर मी काम केले, करत आहे. याचे सर्व श्रेय हे कोकणी जनतेचे आहे. समृद्ध कोकण यासाठी माझे प्रयत्न नेहमीच राहिले. यापुढेही सिंधुदुर्ग, कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नाशील असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मालवण येथे बोलताना केले.

प्रगतीपथावर असलेला आपला भारत विकसित व्हावा, बलवान व्हावा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सूरू आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत देशात फिर एक बार मोदी सरकार…. अबकी बार चारसो पार… हे वातावरण आहे. त्यात आपलाही सहभाग महत्वाचा असून रत्नागिरी सिंधुदुर्गचा विजय 2 लाख मताधिक्याने असेल. असाही विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, विरोधीपक्षनेतेपद मिळेल एवढेही खासदार काँग्रेस पक्षाचे निवडून येत नाहीत. तर ठाकरे गटही मतमोजणी नंतर तडीपार होईल. जनता काँग्रेस, पवार गट व ठाकरे गटाला त्यांची जागा दाखवून देईल. असा हल्लाबोल मंत्री नारायण राणे यांनी केला.

मालवण तालुका कार्यकर्ता मेळावा दैवज्ञ भवन मालवण येथे शुक्रवारी सायंकाळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजप कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी प्रांतिक सदस्य दत्ता सामंत, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, विजय केनवडेकर, रणजित देसाई, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, बाबा मोंडकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, युवामोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, प्रांतिक सदस्य रश्मी लुडबे, संध्या तेरसे, माजी जिप अध्यक्ष सरोज परब, तालुकाध्यक्ष पुजा करलकर, सुहास हडकर, बाळू कुबल, राजु परुळेकर यांसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ठाकरे गटाचे आमदार खासदार नतद्रष्ट : सुदेश आचरेकर यांची टीका

मंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली 1990 पासून सिंधुदुर्ग जिल्हा विकासात भरारी घेत होता. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील 10 वर्षात कोणताही विकास ठाकरे गटाचे आमदार खासदार यांनी केला नाही. जिल्ह्याला विकासकामात मागे नेण्याचे काम झाले. ठाकरे गटाचे आमदार खासदार नतद्रष्ट आहेत. अशी टीका माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांची केली.

यावेळी धोंडी चिंदरकर, अशोक सावंत, सुदेश आचरेकर, सरोज परब, श्वेता कोरगावकर, यांसह अन्य प्रमुख पदाधिकारी यांनी विचार मांडले. आभार विजय केनवडेकर यांनी मांडले.

गुढीपाडव्याच्या दिवशी टेंबेस्वामी समोर श्रीफळ ठेवून प्रचाराचा शुभारंभ : दत्ता सामंत

मालवण कुडाळ तालुक्यात 278 बुथ आहे. प्रत्येक प्रमुख पदाधिकारी स्वतःच्या बुथवर 80 टक्के पेक्षा जास्त मतदान देण्याची जबाबदारी आम्ही घेत आहोत. निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मालवण कुडाळ मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य लोकसभा निवडणुकीत भाजप युती उमेदवाराला मिळवून देणार. गुढीपाडव्याच्या दिवशी टेंबेस्वामी समोर श्रीफळ ठेवून प्रचाराचा शुभारंभ करणार. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वात लोकसभा विजयी होणार. असा विश्वास प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांनी व्यक्त केला.

देशात फिर एक बार मोदी सरकार : प्रभाकर सावंत

केंद्रीय मंत्री नारायण राणे चार दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आणि भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांत मोठा उत्साह निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील भाजप मेळाव्याना मोठी गर्दी होत आहे. देशात फिर एकबार मोदी सरकार… अबकी बार चारसो पार हाच आवाज घुमत आहे. त्याच धर्तीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने विजय मिळवण्याचा विश्वास जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला. भाजप 44 वा वर्धापन दिन साजरा करत असताना रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदा कमळ निशाणीवर भाजप उमेदवार लोकसभा निवडणुक लढवत असल्याचे प्रभाकर सावंत यांनी सांगत विजयाचा विश्वास व्यक्त केला.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक जिंकायची आहे गाजवायची आहे : भाजप नेते निलेश राणे यांनी व्यक्त केला ठाम विश्वास

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक भाजप युतीच्या माध्यमातून जिंकायची आहे गाजवायची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश महासत्ता दिशेने वाटचाल करत असताना रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मागील 10 वर्षाचा बॅकलॉग भरून काढण्याची क्षमता केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब यांच्यात आहे. येथील आमदार खासदार यांनी दहा वर्षात काहीही केले नाही. त्यामुळे लोकही यांना कंटाळले आहेत. अशी टीका भाजप नेते निलेश राणे यांनी केली. विरोधकांकडे विकासाबाबत बोलण्यासारखे काहीही नाही. केवळ अफवा पसरवणे, टीका करणे हेच त्यांचे काम आहे. मात्र विरोधकांनी आमच्या बाबत कितीही अफवा केल्या तरी आम्ही सर्वजण एकसंघ आहोत हे विरोधकांनी आता लक्षात ठेववे. विरोधकांच्या अफ़वाना, भूलथापानां आता जनताही कंटाळली. निवडणुकीत याचे उत्तर मतदानातून दिसेल. रत्नागिरी सिंधुदुर्ग खासदार भाजप युतीचाच विजयी होणार. असा ठाम विश्वास भाजप नेते निलेश राणे यांनी व्यक्त केला.