पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या इनिंगमध्ये ठाकरे पितापुत्र यांनाच तडीपार व्हावे लागणार : ना . नारायण राणे

रत्नागिरी | प्रतिनिधी : दिल्लीतील रामलीला मैदानावर जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना तडीपार करण्याची भाषा करणाऱ्या उद्धव ठाकरे यांची राज्यातली अवस्था काय आहे? त्यांचे खासदार किती? आमदार किती आहेत? व जे आहेत ते सुद्धा जाणार आहेत. त्यामुळे आता यांनाच तडीपार करण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या काळात स्वतः मुख्यमंत्री असताना औषधे, इंजेक्शनच्या खरेदीतून करोडोंचा भ्रष्टाचार करणाऱ्या उद्धव ठाकरेंना त्यांच्या पुत्रासह नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या नव्या इनिंगमध्ये तडीपारच व्हावे लागणार आहे. आता खासदार विनायक राऊतांच्या प्रचारासाठी येणाऱ्या उद्धव ठाकरे यांना जिल्हा, तालुका नव्हे तर दारातसुद्धा उभे करू नका असा घणाघात भाजपा नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला. रत्नागिरी येथे झालेल्या भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरी शहरात शहर, तालुका पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी खासदार निलेश राणे, लोकसभा प्रभारी माजी आमदार बाळ माने, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता देसाई, भाजपचे ज्येष्ठ नेते अॅड. बाबा परुळेकर, महिला जिल्हाध्यक्ष सुजाता साळवी, माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर, महेंद्र मयेकर, जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे, तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे, दादा दळी, लीलाधर भडकमकर, सचिन वाहळकर, भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष ऋषिकेश केळकर, महिला शहराध्यक्ष पल्लवी पाटील, प्रशांत डिंगणकर, मंदार मयेकर, राजन फाळके यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांना संबोधित करताना ना. राणे म्हणाले, की आज या सभागृहात झालेली गर्दी, तुमच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास पाहून इथून फक्त भाजपचाच उमेदवार निवडून येऊ शकतो याची मला खात्री झाली आहे. देशात, राज्यात आपली सत्ता आहे. मोदींचे नेतृत्व जगमान्य आहे. सन २०१४ मध्ये अर्थव्यवस्थेत जगात ११ व्या क्रमांकावर असलेला भारत देश नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात दहा वर्षात पाचव्या क्रमांकावर पोहचला आहे व लवकरच तो तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार आहे. ६५ वर्षात जे काँग्रेससह राहुल गांधींना जमले नाही ते मोदींनी करुन दाखविले आहे. काँग्रेसने ४५ पानांचा जाहीरनामा काढला आहे, पण नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्या विकास यात्रेसमोर कोणाचाही टिकाव लागू शकणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे. त्यामुळे विरोधी पक्षनेता होण्याएवढे संख्याबळही त्यांच्याकडे नाही. त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे रामलीला मैदानावर गेले, तिथे मोदींना हद्दपार केले पाहिजे असे भाषण ठोकून आले. पण मोदींवर टीका करण्यापूर्वी स्वतः उद्धव ठाकरे यांनी विकासात्मक कोणते काम केले ते सांगितले पाहिजे.  ठाकरेंमुळे किती कारखाने, किती उद्योग आले, किती प्रमाणात रोजगार निर्माण झाला हे त्यांनी दाखवले पाहिजे. जेव्हा कोरोना काळात लोकांकडे खायला अन्न नव्हते त्यावेळी पंतप्रधानांनी देशातील ८० कोटी लोकांना मोफत अन्न दिले.  आरोग्य सुधारण्यासाठी आयुष्यमान योजना सुरु केली. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे फक्त दोन दिवस मंत्रालयात गेले व उरलेला कारभार मातोश्रीवरून चालवला.  कोरोना काळात रुग्णांच्या इंजेक्शन, औषध खरेदीमध्ये भ्रष्टाचार केला. ते आज राहुल गांधी, केजरीवाल यांच्या बाजुला उभे राहून मोदींवर टीका करत आहेत पण आता त्यांना जिल्हा, तालुकाच नव्हे तर दारासमोरपण उभे करू नका असे सांगितले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत कोकणी माणसाचे मोठे योगदान आहे. मी १९६१ सालचा शिवसैनिक आहे. बाळासाहेबांसोबत आम्ही शिवसेना घडवली आहे पण आज कोकणी माणसांसाठी उद्धव ठाकरे यांनी काय केले ते सांगा? आज मुंबईतून मराठी माणूस हद्दपार झाला आहे. यांनी दोन मातोश्री बांधल्या पण साधा शिवसैनिक कुठे गेला याचे त्यांना देणे घेणे नाही. रत्नागिरी सिंधुदुर्गने यांना खासदार, आमदार दिले पण यांनी या दोन जिल्ह्यांसाठी काय दिले? एखादा कारखाना, उद्योग, साधी शाळासुद्धा इथला खासदार गेल्या १० वर्षात उभा करू शकला नाही असे ना. राणे म्हणाले.

१९९० ला मी जेव्हा सिंधुदुर्गमध्ये आलो तेव्हा या जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न  ४० हजार रुपये होते, तेच आता २ लाख पेक्षा जास्त झाले आहे. रत्नागिरी सुद्धा महाराष्ट्रात नावाजलेला जिल्हा आहे. इथे अनेक नररत्ने जन्मली आहेत. असे असतानाही इथे अद्याप प्रगती झालेली नाही. त्यामुळे इथे आता परिवर्तन करूया, मोदिजींच्या विकास यात्रेला साथ देताना ४०० पार करूया. तुमच्यावर प्रेम करणारा, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनापासून काम करणारा तुमच्या हक्काचा खासदार करूया. रत्नागिरीचा आवाज दिल्लीत खणखणीत पोहोचला पाहिजे. त्यासाठी सज्ज होऊया. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाने या वर्षी १०० निधी खर्च करताना देशातील उद्योगाच्या प्रत्येक क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केली आहे.  देशाच्या प्रत्येक भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. कोकणात सिंधुदुर्गमध्ये मोठे प्रशिक्षण केंद्र तसेच ५०० नवे कारखाने मी उभारणार आहे. या भूमीने मला न मागता अनेक मानसन्मान पदे दिली, मुख्यमंत्री पद दिले, केंद्रात मंत्री केले त्या भूमीचे मी देणे लागतो, त्यामुळे इथल्या लोकांची प्रगती कशी होईल याकडे माझ लक्ष असते. मंत्री झाल्यावर गेल्या अडीच वर्षात अनेक कामे मी केली आहेत, पण गेल्या दहा वर्षात येथील खासदाराने इथे फक्त टोलचा ठेका मिळवण्यासठी प्रयत्न केला.  पण तोही प्रयत्न निलेश राणे यांनी बंद पाडला. त्यामुळे इथे बदल घडवायचा असेल तर ही निवडणूक महत्वाची आहे. यासाठी रत्नागिरीने मोदिजींच्या विकासयात्रेत हातभार लावावा. एकजुटीने प्रयत्न करून इथला भाजपाचा खासदार अडीच लाख मताधिक्क्याने निवडून देऊया आणि मोदिजींच्या पंतप्रधानपदाची हॅट्ट्रीक पूर्ण करण्यासाठी हातभार देतानाच येथे योग्य माणसाला निवडून आणण्यासाठी प्रयत्न कराल असा विश्वास ना. नारायण राणे यांनी व्यक्त केला.

यावेळी लोकसभा सहप्रभारी माजी आमदार बाळ माने म्हणाले की, आमचे कार्यकर्ते विजयासाठी सज्ज आहेत. अबकी बार ४०० पार हा आमचा निश्चय आहे. २० वर्षानंतर वनवास संपला आहे. आजपर्यंत अनेक अडचणी आल्या. पण आता भाजप केवळ फक्त मत देणारां पक्ष नाही तर नेतृत्व करणारा भाजप झाला आहे. विकसित भारतासोबतच रत्नागिरी सुद्धा विकसित रत्नागिरी करायची आहे. तेव्हा या प्रक्रियेत सहभागी होताना सगळ्यांनीच युतीचा धर्म पाळायचा आहे अस सांगत जिथे नारायणराव राणे यांचे नेतृत्व असते तिथे विजय होतोच याचे शुभसंकेत मिळू लागल्याचेही ते म्हणाले.
जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी यावेळी ना. नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे यांच्यासह व्यासपीठावरील सर्वांचे स्वागत केले. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष सावंत म्हणाले, राणे साहेबांकडे जेव्हा सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग खाते आले तेव्हा त्या खात्याबद्दलची माहिती आणि महत्व समजले. त्यांनी सुरु केलेल्या विश्वकर्मा योजनेमुळे समाजातील अनेक घटकांना स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याचे बळ मिळाले. प्रत्येकाच्या हाताला काम मिळाले, असे व्हिजन असलेला नेता आपला नेता आहे. राणे साहेब जिथे असतील त्या पदाला न्याय मिळतो.  त्यामुळे आता अबकी बार ४०० पार करताना इथे विकास घडवण्यासाठी तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन कामाला सुरुवात करूया आणि इथल्या उमेदवाराला सर्वाधिक मताधिक्याने निवडून देऊया असे सांगितले.

यावेळी अनेक मुस्लीम समाजातील नागरिकांनी ना. राणे यांची भेट घेऊन सदिच्छा व्यक्त केल्या.