तुमचा आर्थिक स्तर सुधारायचा असेल तर उद्धव ठाकरेंची शिवसेना हद्दपार करा- केंद्रीय मंत्री नारायण राणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशाची वाटचाल महासत्तेच्या दिशेने

लांजा (प्रतिनिधी) तुमचा आर्थिक स्तर सुधारायचा असेल तर येथील आमदार, खासदार आणि पर्यायाने उद्धव ठाकरेंची शिवसेना हद्दपार करा, असे जोरदार टीकास्त्र केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लांजा येथील भाजपा कार्यकर्ता संवाद मेळाव्याप्रसंगी केले.


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी सात एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे हे लांजा दौऱ्यावर आले होते .यावेळी त्यांच्या प्रमुख उपस्थितीत लांजा येथील अजिंक्य मंगल कार्यालयात तालुका भाजपाच्या वतीने कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना नारायण राणे हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी खासदार खासदार निलेश राणे, माजी आमदार बाळ माने, माजी आमदार आणि लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी प्रमोद जठार, महिला प्रदेश सचिव शिल्पा मराठे ,राजापूर विधानसभा प्रभारी उल्का विश्वासराव, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत ,लांजा तालुका अध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, जिल्हा उपाध्यक्ष महेश खामकर, शहराध्यक्ष गुरुप्रसाद तेली, भाजपा युवा मोर्चाचे लोकसभा संयोजक आणि नगरसेवक संजय यादव तसेच जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना .नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे, खासदार विनायक राऊत यांचा खरपूस समाचार घेतला. दहा वर्षात येथील आमदार आणि खासदाराने काय केले? कोणती विकास कामे केली? किती प्रकल्प आणलात? किती बेरोजगारांना रोजगार दिला? किती कुटुंब उभी केलात असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. आम्ही येथील बेरोजगारांसाठी प्रकल्प आणले. परंतु येथील खासदारांच्या नाकर्तेपणामुळे ते परत गेले आणि आज येथील बेरोजगारांच्या हाताला, तरुणांच्या हाताला काम नाही. त्यांना नोकरी नाहीत आणि म्हणून तुमचा आर्थिक तर सुधारायचा असेल तर उद्धव ठाकरेंची शिवसेना हद्दपार व्हायला पाहिजे. उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींना हुकूमशहा असल्याचे सांगतात. मात्र कोरोना काळात याच उद्धव ठाकरेंनी गोरगरिबांचे पैसे औषधांच्या माध्यमातून खाल्ले आणि त्याची सध्या चौकशी सुरू आहे.
याउलट पंतप्रधान मोदींनी देशाला आपल्या सर्वस्व दिले. गोरगरीब जनतेसाठी त्यांचे जीवन उंचावण्यासाठी शेकडो लोक कल्याणकारी योजना राबवल्या. 80 कोटी जनतेला मोफत धान्य पुरवठा केला .आज आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही पाचव्या क्रमांकावर नेली आहे आणि म्हणूनच या निवडणुकीत 400 चा टप्पा पार करताना तिसऱ्यांदा आपल्याला मोदींना पंतप्रधान करायचे आहे. आणि त्यासाठी या मतदारसंघातून आपल्या हक्काचा खासदार निवडून द्यायचा आहे.
येथील खासदाराने कायमच विकासाला विरोध केला आहे. याच खासदाराने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विमानतळाला, सी वर्ल्ड ला विरोध केला पण आज तो विरोध झाला नसता तर दोन्ही जिल्ह्यातील लोकांना रोजगार मिळाला असल्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण झाले. पण रत्नागिरी जिल्ह्यातील महामार्गाचे काम का रखडले आहे? याचा कधी विचार केलात का? कधी याची साधी चौकशी केलीत का? असे देखील राणे यांनी प्रश्न उपस्थित केला.
ज्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना वाढवली, चांगले दिवस आणले, मजबूत केली. तीच शिवसेना उद्धव ठाकरे याने अवघ्या दोन वर्षात संपवली. तर 56 पैकी 40 आमदार शिवसेना सोडून गेले. आणि आता हा उद्धव ठाकरे 16 आमदारांचे तुणतुणे वाजवत बसला आहे अशा टीका ना . राणे यांनी केली.
सुरुवातीला विधानसभा क्षेत्र प्रमुख उल्काताई विश्वासराव यांच्यासह राजन देसाई, माजी आमदार बाळ माने, प्रमोद जठार यांनी देखील मार्गदर्शन करताना आपल्या भाषणातून येथील आमदार ,खासदारांच्या नाकर्तेपणाचा पाढा वाचला. या कार्यकर्ता संवाद मेळाव्याला लांजा तालुक्यातून मोठ्या प्रमाणात भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते