मोकाट गुरे, कुत्रे, अनियंत्रित कचऱ्यावर आणणार नियंत्रण तर स्माशानभूमीचे दर वाढले
रत्नागिरी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न; शहर विकासाच्या ४५ विषयांवर झाली चर्चा
रत्नागिरी: प्रतिनिधी
कचरा नियंत्रणासाठी सीसीटीव्ही कॅमरे, उनाड गुरे, कुत्रे, डास यावर नियंत्रण, ट्रक टर्मिनल सुरु करणे, सिग्नल यंत्रणा सुरु करणे, शहरातून जाणार्या नाल्यातील सांडपाणी प्रक्रिया, स्वतंत्र सांडपाणी पाईप लाईन व्यव्यस्था या महत्वाच्या विषयासह ज्या ठेकेदारांनी कामे अपूर्ण ठेवली आहेत त्यांना थेट नोटीसा बजावण्या सारखे महत्वाचे विषय आजच्या रत्नागिरी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आले. त्यातच नगर परिषदेच्या आर्थिक नियोजनासाठी मृतदेहांवर अंतिम संस्कार करणेसाठी आता दर वाढवण्याचा निर्णय रत्नागिरी नगर परिषदेने घेतला आहे.
रत्नागिरी नगर परिषदेची महत्त्वाची सर्वसाधारण सभा आज दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी नगर परिषद सभागृहात अध्यक्षा शिल्पा प्रशांत सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत शहराच्या आरोग्य, स्वच्छता, रस्ते रुंदीकरण आणि प्रशासकीय धोरणांशी संबंधित एकूण ४५ विषयांवर सविस्तर चर्चा करून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. सभेची सुरुवात मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून करण्यात आली. त्यानंतर विषयपत्रिकेवरील विविध जनहिताच्या मुद्द्यांवर प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये सर्वपक्षीय नगरसेवकांनी गुरूवारच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूरी दिली. या विषयासंदर्भात कार्यालयीन टिपणी वाचण्यात आली तेव्हा मृतदेह अंतिम संस्कारासाठी सुमारे 35 लाख रुपये खर्च होतो असे सभा अधिक्षक जितेंद्र विचारे यांनी सभागृहाला सांगितले. त्यानंतर सुधारीत वाढीव दर वाचण्यात आले. शहरातील मृतदेहाच्या अग्निसाठी लागणाऱ्या लाकडांना 1500 रुपये, शहरा बाहेरच्या मृतदेहासाठी 2500 रुपये मोजावे लागणार आहेत. गॅस शवदाहिनीसाठी शहरातील मृतदेहाच्या अंतिम संस्कारासाठी 1000 रुपये तर शहराबाहेरच्या मृतदेहासाठी 2000 रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत.
रत्नागिरी नगर परिषदेची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी यापूर्वीच्या सभेत अग्निशमन आणि दिवाबत्ती कर वाढवण्यात आले होते तर आता अंतिम संस्काराचे दर वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे रत्नागिरी शहरात सध्या मरण महागले आहे.
स्मशान भूमीतील अंत्यसंस्काराचे दर वाढवताना तेथे स्वच्छता असावी, चितेवर लाकडे रचून ठेवण्यासाठी नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी नगरसेविका स्मितल पावसकर, नगरसेवक सौरभ मलुष्टे आणि राजीव कीर यांनी केली.
शहरातील कचरा समस्या सोडवण्यासाठी प्रभाग १ ते १६ मध्ये कचरा टाकणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी CCTV कॅमेरे आणि प्रतिबंधक फलक लावण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. तसेच, डास प्रतिबंधक फवारणी तात्काळ सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. भटक्या कुत्र्यांचा आणि मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला. भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात येणार आहे. तसेच, शौचालयांच्या पाइपवर जाळ्या बसवून डासांच्या उत्पत्तीला आळा घालण्याचे निश्चित झाले.
शहर विकास योजनेअंतर्गत प्रलंबित असलेल्या रस्ते रुंदीकरणाच्या कामांना गती देण्याबाबत चर्चा झाली. तसेच, शहरातील वाहतूक शिस्त लावण्यासाठी बंद असलेली सिग्नल यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी जयस्तंभ येथे सिग्नल यंत्रणा सुरु करताना अधिक काळजी घ्यावी अशी सूचन नगरसेवक सुहेल मुकादम यांनी केली.
उद्यमनगर (प्रभाग १) येथील सांडपाण्यामुळे दूषित होणाऱ्या पाणीसाठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा पाइपलाइन आणि FSTP प्लांटच्या व्यवस्थेवर चर्चा करण्यात आली. या दुषित पाण्यामुळे नागरिकाच्या आरोग्यावर परिणाम होत असून याबाबत लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली. तर यावेळी रत्नागिरी शहरातून सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांवर १४ ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया सुरु करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षाच्या वतीने सांगण्यात आले. त्यात भगवती बंदर राजीवाडी, कोस्टल रोड, निवखोल, मांडवी, घुडेवाठार, मांडवी, नाचणे अभूद्य नगर, राजिवडा नाचणे, माजगाव येथील भागांचा समवेश असणार आहे.
सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी शहरातील मंगळवार बाजार, शनिवार बाजार आणि मच्छी मार्केटच्या जाहीर लिलावाबाबत प्रक्रिया निश्चित करण्यात आली. यात १० टक्क्यांनी वाढ करण्यात आली. यावेळी जो ठेकेदार हा मक्ता घेईल त्याच्यावरच संबंधित बाजाराच्या स्वच्छतेची जबाबदारी निश्चित करून द्यावी अशी आग्रही मागणी ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये, श्री. विलणकर यांनी केली. तर नगर परिषदेच्या उत्पन्न वाढीसोबत साळवी स्टॉप या गजबजलेल्या ठिकाणी वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी नगर परिषदेच्या मालकीच्या आरक्षण क्रमांक ११७ येथील ट्रक टर्मिनल सुरु करून ट्रकना प्रतिदिन भाडे अकरावे हा प्रस्ताव्ह मंजूर करण्यात आला. त्याचवेळी तेथे ट्रक चालकांसाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्या, या कामाव्यतिरिक्त तिथे अन्य लोकांना जागा देऊ नये अशी मागणी माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी केली तर ठेकेदाराला काम देण्याऐवजी नगर परिषदेने हे काम घेऊन उत्पन्न वाढ करावी अशी मागणी सौरभ मलुष्टे यांनी केली.
रत्नागिरी नगर परिषदेच्या मालकीचे काही हॉल सध्या बंदावस्थेत आहेत, किंवा त्यांची योग्य तऱ्हेने देखभाल दुरुस्ती होत नाही असा मुद्दा ज्येष्ठ नगरसेविका स्मितल पावसकर, निमेश नायर यांच्यासह अन्य नगरसेवकांनी मंडला. यामध्ये या हॉलचे भाडे वाढवावे असाही मुद्दा मांडून तो मंजूर करण्यात आला.
शाळा क्रमांक दोनचे काम थांबले असल्याचा मुद्दा सभागृहात मांडण्यात आला. त्याचवेळी या प्रमाणेच काही ठेकेदारांनी अन्यही कामे थांबवली असल्याचे काही सदस्यांनी मांडल्यानंतर अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची नोटीस तत्काळ बजावण्यात येईल असेल मुख्याधिकारी वैभव गारवा यांनी सभागृहाला स्पष्ट केले. याशिवाय शौचालय टाकी साफ करणाऱ्या ठेकेदाराकडे पैसे भरूनही वेळेवर काम होत नसल्याचे सदस्य सुहेल मुकादम यांनी मांडले तर आगामी शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नादुरुस्त रस्ते दुरुस्त करून खड्डे भरावे अशी आग्रही मागणी मागासवर्गीय कल्याण विशेष समिती सभापती विजय खेडेकर यांनी केली.
आगामी ८ मार्च – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शहरातील महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा आणि सन्मान सोहळे आयोजित करण्याच्या नियोजनावर शिक्कामोर्तब झाले. ‘आधार’ नागरी बेघर निवारा केंद्राचे नाव बदलून ‘स्नेहमंदिर निवारा केंद्र’ असे करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या स्व निधीतून मांडवी समुद्र किनारी सोलर लाईट बसवण्याचा ठराव मंजूर झाला. हे सोलर लाईट सुरक्षित रहावेत, यासाठी त्याठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याची आणि या सोलर लाईटची देखभाल दुरूस्तीची जबाबदारी नगर परिषदेने घ्यावी अशी मागणी भाजप नगरसेविका वर्षा ढेकणे यांनी केली.
या सभेत विविध विभागांच्या कामांना मुदतवाढ देणे आणि अंदाजपत्रकीय तरतुदींना मंजुरी देणे यांसारखे प्रशासकीय विषयही मार्गी लावण्यात आले. अध्यक्षांच्या अनुमतीने आलेल्या ऐनवेळच्या विषयांवरही यावेळी चर्चा करण्यात आली.











