वडिलांच्या खूनासाठी इंटरनेटवर शोधलं; 8 दिवस प्रयत्न केले, मृत्यू होईना म्हणून…

छत्रपती संभाजीनगर : कर्जबाजारी झालेल्या मुलाने वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. त्यानंतर त्याने आईचाही गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला.

सोमवारी रात्री जेवण करून सगळे झोपल्यानंतर तरुणाने वडिलांची पोटात स्क्रू ड्रायव्हर खुपसून हत्या केली. तर आईचा गळा दाबत असताना मुलगी जागी झाल्याने तो पळून गेला. आता या प्रकरणी धक्कादायक अशी माहिती समोर येत आहे.

गेल्या आठ दिवसांपासून तो वडिलांचा मृत्यू होण्याच्या उद्देशाने त्यांना झोपेच्या गोळ्या देत होता. गोळ्यांचा त्यांच्यावर परिणाम झाला नाही. सोमवारी रात्री त्याने पुन्हा आइस्क्रीममधून गोळ्या दिल्या. तरीही मंगळवारी पहाटे वडील निवांत झोपलेले दिसल्यावर मुलाने पोटात स्क्रू ड्रायव्हर खुपसून जन्मदात्या वडिलांची क्रूर हत्या केली. शेअर मार्केटमध्ये लाखो रुपये हरून पोर्टफोलिओ घसरल्याने मानसिक स्थिती बिघडलेल्या मुलाने हे घृणास्पद कृत्य केले. श्रीकृष्ण वामन पाटील असे मृत वडिलांचे नाव असून मुलगा रोहित याला पोलिसांनी काही तासांत अटक केली.

हत्या, आत्महत्येसाठी इंटरनेटवर रिसर्च आणि मग प्रयत्न
8 दिवसापासून रोहितने वडीलांना वेगवेगळ्या गोळ्या, भुकटी खाऊ घातली. मात्र, गोळ्यांचा परिणाम झाला नाही. तो सोमवारी दुपारी बाहेर गेला व उस्मानपुऱ्यात बियर रिचवली. गळा कसा आवळावा, हत्या कशी करावी, आत्महत्या कशी करावी, हे इंटरनेटवर सर्च केले. त्यानंतर घरी परतला. रात्री वडिलांना आइस्क्रीममधून गोळ्या दिल्या.

पहाटे 5 वाजता तळमजल्यावर वडील झोपलेले दिसताच रोहितने त्यांचा गळा दाबला वडिलांनी त्याला प्रतिकार करत लाथ घातली. मग रोहितने स्कू ड्रायव्हरने पोटाची चाळणी केली. वर जाऊन आईचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला; पण तितक्यात बहीण गौरीला जाग आली. वडिलांना उठवण्यासाठी तळमजल्यावर धाव घेतली; पण वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात पाहून घाबरून ती घराबाहेर पळाली, हत्येनंतर रोहितने स्वतःही गळ्ळ्याला इजा करून घेऊन लुटारूंनी मारल्याचा बनाव केला.