तरसंबळेतील विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

पती पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी/ रोहन कांबळे

राधानगरी : तालुक्यातील तरसंबळे गावात घडलेल्या विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विवाहित रूपाली प्रवीण गुरव (वय २८) हिच्या मृत्यूमागे सासरच्या बाजूने केलेला सततचा छळ आणि दहा तोळे सोन्याच्या मागणीमुळे घातपात झाल्याचा गंभीर आरोप तिच्या आई-वडिलांनी केला आहे. या प्रकरणात पती प्रवीण गुरव याला राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, निष्पक्ष तपास आणि न्यायाची मागणी नातेवाईक करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार,राधानगरी येथील पांडुरंग गुरव यांची कन्या रूपालीचा विवाह २०१८ मध्ये तरसंबळे येथील प्रवीण गुरव यांच्याशी झाला होता. लग्नाच्या काही दिवसांतच सासू-सासऱ्यांसह पतीने दहा तोळे सोन्याची मागणी सुरू केली. याशिवाय माहेरील शेतजमिनीचे हस्तांतरणही करून द्यावे, अशी सक्ती केली जात होती. यामुळे रूपालीला सतत मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागत होता. तिला दोन लहान मुले असूनही सासरच्या या वागण्यामुळे ती वारंवार माहेरी परत येत होती. राधानगरी पोलिस ठाण्यात पांडुरंग गुरव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, प्रकरणात पती प्रवीण गुरव याला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू असून, सासू-सासऱ्यांच्याही जबाबांची नोंद घेतली जात आहे. विवाहातील हुंडा मागणी आणि छळाचा आरोप असल्याने याबाबतच्या कलमाखाली गुन्हा दाखल आहे. रूपालीच्या आई-वडिलांनी भावनिक होऊन मुलीला न्याय मिळण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे तरसंबळे गावात आणि राधानगरी तालुक्यात हुंडा प्रथेविरोधात संताप निर्माण झाला असून, नागरिकांकडून अशा घटनेचा निषेध नोंदवला जात आहे. दरम्यान या प्रकरणी अधिक तपासात राधानगरी पोलीस करत आहेत.