मालवण | प्रतिनिधि : माझ्या वार्डमध्ये बुथ वरती शिवसेनेला टेबल लावायला माणूस मिळत नव्हता. पोलिंग एजंट बसायला प्रतिनिधी मिळत नव्हता. त्यावेळपासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही त्या ठिकाणी बूथवर कार्यरत होतो. घरोघरी जाऊन प्रचार करत होतो. आताचे ठाकरे गटाचे मालवणातील पदाधिकारी राजकारणातही नव्हते. अशी टीका भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा भाजपा मालवण शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांना उद्देशून केली आहे.
केनवडेकर यांनी प्रसिद्धीपत्रक द्वारे भूमिका मांडली. केनवडेकर म्हणाले, वैयक्तिक टीका टिपणी करणे आम्ही कधी पण टाळत असतो. माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू हे माझे गुरु आहेत. गुरुंची सेवा करणे मला कोणत्याही प्रकारची लाज वाटत नाही आणि वाटणारही नाही. पण हरी खोबरेकरांना सांगू इच्छितो की २०१४, २०१९ च्या निवडणुकीमध्ये त्याचबरोबर १९९० सालच्या निवडणुकीच्या आधी माझ्या वार्डमध्ये माझ्या बुथ वरती शिवसेनेला टेबल लावायला माणूस मिळत नव्हता व पोलिंग एजंट बसायला प्रतिनिधी मिळत नव्हता. त्यावेळी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही त्या ठिकाणी बूथवर टेबल लावत होतो. घरोघरी जाऊन प्रचार करत होतो. त्यावेळी आपण राजकारणातही नव्हता. शिवसेनेबरोबर प्रचार केला म्हणून माझ्या घरावरती पण दगडफेक झाली होती. त्यात माझे वडील जखमी झाले होते. त्यावेळी केंद्रीयमंत्री नारायण राणे हे एकमेव नेते आमची विचारपूस करण्यासाठी आले होते. हे जनतेला माहिती आहे आम्ही काय प्रचार केला ते. आपण सांगण्याची काही जरुरी नाही. त्याचबरोबर आम्ही आमच्या गुरुची सेवा केली आहे. आपण कोणाची सेवा करत असता हे पूर्णपणे जग जाहीर आहे. गुरुची सेवा करत असताना मला कधी मागच्या दाराने पळून जाण्याची नामुष्की आली नाही असाही टोला केनवडेकर यांनी लगावला.












