त्या वीजमीटरच्या चौकशीचे आदेश

खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील चाकाळे येथील अशोक मारुती यादव यांच्या मागणीनुसार वीजमीटर बसलेला नसतानाही त्यांना ३७० रूपयांचे वीजबिल देण्यात आल्याच्या प्रकारची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

अशोक यादव यांनी घराच्या वरच्या मजल्यावर नवीन मीटरसाठी ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर चारच दिवसात मंजुरी मिळताच त्या पोटी येथील महावितरणच्या कार्यालयात रक्कम भरणा केली होती. वीजमीटर बसलेला नसतानाही त्यांना मीटरचे ३७० रूपयांचे वीजबील महावितरणकडून देण्यात आल्याने त्यांनी रितसर तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर खडबडून जागे झालेल्या महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकाराची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.