मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान म्हणून निवडताना महायुती भक्कमपणे या निवडणुकीत सामोरी जावी यासाठी किरण सामंत यांनी निवडणुकीतून माघार घेतली असल्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी आज मुंबई येथे पत्रकार परिषदेत केली. भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पूर्ण ताकदीने काम करुन, अशी ग्वाही सुद्धा मंत्री उदय सामंत यांनी दिली.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे चोविस तास उरले असताना पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री सामंत यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले उमेदवारीसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केल्यानंतर किरण उर्फ भय्या सामंत यांनी तूर्त थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर कुटुंबासोबत देखील चर्चा झाली. नारायण राणे ज्येष्ठ नेते असून ते राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री राहिले आहेत. त्यामुळे नारायण राणे यांना आपण शिवसेना म्हणून पूर्ण ताकदीने आणि प्रामाणिकपणाने काम करु, असे ठरवण्यात आल्याचे ते म्हणाले.
रत्नागिरी-सिंधुदुर्गची जनता महायुतीसोबत आहे. इंडिया आघाडीचा खासदार निवडून येऊ नये हे महत्वाचे असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्या वेळी या देशाचे नेतृत्व करण्यासाठी भक्कम साथ देणे आवश्यक असल्याने यासाठी किरण सामंत यांनी हा निर्णय घेतला. कोणतीही अपेक्षा न ठेवता हा निर्णय घेणे हा किरण सामंत यांचा मनाचा मोठेपणा असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. विजयाकडे एखाद्या उमेदवाराला कसे न्यायचे हा इथला पॅटर्न आहे. आठ दिवसांपूर्वी केलेले ट्विट हे सर्व परिस्थितीचा आढावा घेऊनच करण्यात आले होते, असे उदय सामंत यांनी सांगितले.












