विन्हेरे स्थानकानजीक मत्स्यगंधा एक्सप्रेसमधून महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

खेड (प्रतिनिधी) कोकण   रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या मत्स्यगंधा एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावत पोबारा केल्याची घटना विन्हेरे स्थानकानजीक घडली. मत्स्यगंधा एक्सप्रेस विन्हेरे स्थानकात क्रॉसिंगसाठी थांबली असता ही घटना घडली.
ही महिला एक्सप्रेसच्या एस-८ आरक्षित डब्यातून प्रवास करीत होती. अज्ञात चोरट्याने मंगळसूत्र हिसकावत तातडीने पलायन केले. येथील पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे मात्र  १० दिवसांपूर्वी दिवाणखवटी स्थानकातही असाच प्रकार घडला होता. कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्या महिलांचे दागिने लंपास करणाऱ्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे.
कोकण रेल्वेगाड्यांतून महिलांचे दागिने लंपास करण्याच्या घडलेल्या मोजक्याच घटना उघडकीस आल्या आहेत. यामुळे प्रवाशांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. रेल्वेगाड्यांतील वाढत्या चोऱ्यांच्या घटनांमुळे चोरट्यांची टोळी कार्यरत असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. रेल्वे पोलिसांसह स्थानिक पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेवून गस्त वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे.