दाभोली इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांसाठी नवे दालन “ओपन एग्रीकल्चर क्लास रूम”

मान्यवरांच्या हस्ते झाला शुभारंभ : शिक्षण क्षेत्रातील एक अभिनव उपक्रम

वेंगुर्ले : दाजी नाईक
शाळेमध्ये मागील वर्षापासून शाळेच्या माजी विद्यार्थी पालक ग्रामस्थ व दाते यांच्या सहकार्यातून व कॉज टू कनेक्ट फाउंडेशन यांच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने तसेच शाळेच्या सामाजिक वनीकरण विभाग राष्ट्रीय हरित सेना इको क्लब यांच्या वतीने शाळेमध्ये शेती व बागकाम तंत्रज्ञान विभाग याच्या प्रात्यक्षिक कार्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना शेती व बागकाम या विषयाची आवड व महत्त्व समजण्यासाठी “ओपन एग्रीकल्चर क्लास रूम” सुरू करण्यात आला. या उपक्रमाचा शुभारंभ दाभोली गावचे सुपुत्र श्री वसंत प्रसाद दाभोलकर यांच्या शुभहस्ते व श्री आर टी मगदूम विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग सिंधुदुर्ग यांच्यावतीने शालेय परिसरामध्ये करण्यात आला. महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील एक अभिनव असा हा उपक्रम आहे.

या शुभारंभ प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी शेती व बागकाम तंत्रज्ञान यासाठी लागणाऱ्या विविध साधन तसेच अवजारे यांची माहिती दिली व त्याचे उपयोग स्पष्ट केले. शेतीसाठी आवश्यक विविध वाफे पद्धती बाबत शालेय विद्यार्थ्यांनी उदा. गादीवाफा, सरी वाफा इत्यादी बाबत माहिती दिली. शेती व बागकाम विभागाच्या कृषी पदविका धारक श्रीमती प्रतीक्षा पोईपकर यांनी शालेय विद्यार्थ्यांना या विभागाच्या प्रात्यक्षिक कार्यासाठी अत्यावश्यक या ओपन एग्रीकल्चर क्लासरूमचे अर्थात शेती प्रयोगशाळेची माहिती दिली.

यावेळी बोलताना श्री. दाभोलकर सर यांनी शाळेने सुरू केलेल्या या अभिनव शैक्षणिक शेती विषयक अभ्यासक्रमाचे कौतुक केले व या विषयांतर्गत विद्यार्थ्यांनी विविध भाजीपाला यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून स्वतःची बचत करावी असे सांगितले. शालेय जीवनामध्ये अशा प्रकारच्या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे असे त्यांनी सांगितले.

श्री आर. टी. मगदूम विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग सिंधुदुर्ग यांनी राष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून शाळेमध्ये सुरू केलेल्या ओपन एग्रीकल्चर क्लासरूम उपक्रमाला शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी शाळेमध्ये राष्ट्रीय हरित सेना इको क्लब अंतर्गत सुरू केलेल्या आमची देवराई औषधी वनस्पती उद्यान या उपक्रमाचे विशेष कौतुक करून कोकणातील पारंपारिक देवराई पद्धती व यातून पिढ्यान पिढ्या जपले जाणारे वृक्षांचे महत्त्व या दाभोली इंग्लिश स्कूल दाभोली ची आमची देवराई वन औषधी उद्यान याचे विशेष अभिनंदन केले. सामाजिक वनीकरण विभाग सिंधुदुर्ग राष्ट्रीय हरित सेना इको क्लब यांच्या माध्यमातून भविष्यात शाळेमध्ये विविध उपक्रम राबवण्याचा मानस व्यक्त केला तसेच शाळेसाठी आवश्यक वृक्ष रोपे यांची मागणी केल्यास त्याची विभागाच्या वतीने शाळेसाठी उपलब्ध केली जातील असे सांगितले. याप्रसंगी श्री तुषार पवार इंडियन रेल्वे मॅनेजमेंट अधिकारी, ॲड.मयूर निकम पुणे, श्री रमण किनळेकर सर माजी मुख्याध्यापक, श्री प्रसाद दाभोलकर, श्री सुभाष गावडे सर, श्री सायमन मोनतेरो, श्री रवींद्र प्रभू माजी विद्यार्थी, श्री सुधीर गोलतकर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, श्री बागुल सर हरित सेना अधिकारी, श्री किशोर सोनसुरकर सर मुख्याध्यापक, श्री मती रेश्मा चोडणकर, श्री वसंत पवार ,श्री नितीन घोगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

ओपन एग्रीकल्चर क्लासरूम शेती प्रयोगशाळा म्हणजे काय

आपला भारत देश हा शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो

शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना शेती या विषयाची आवड निर्माण व्हावी तसेच शेती संबंधित विविध तंत्रज्ञान व उद्योग याची ओळख व्हावी मानवी जीवनामध्ये शेतीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेतकऱ्याने शेती पिकवली तरच आपल्याला अन्न मिळू शकते त्यामुळे शेती बागकाम व तंत्रज्ञान या विषयाची आवड निर्माण व्हावी यासाठी शाळेमध्ये गतवर्षीपासून शाळेचे माजी विद्यार्थी पालक ग्रामस्थ हितचिंतक यांच्या सहकार्यातून कॉज कनेक्ट फाउंडेशन पुणे यांच्या वतीने शाळेमध्ये तंत्रशिक्षण विभाग सुरू करण्यात आला. यामध्ये एकूण चार विभाग आहेत पैकी शेती व बागकाम तंत्रज्ञान हा विषय शालेय विद्यार्थ्यांना आपल्या शालेय अभ्यासक्रमासोबत शाळेमध्ये शिकविला जातो.

भविष्यात येऊ घातलेल्या शैक्षणिक धोरणामध्ये शेती या विषयाला महत्त्व दिले गेले आहे याची पूर्वतयारी म्हणून शाळेच्या वतीने हा विभाग सुरू करण्यात आला आहे. या विभागाच्या वतीने लेखी व प्रात्यक्षिक या स्वरूपामध्ये मार्गदर्शन केले जाते.विद्यार्थ्यानी प्रात्यक्षिक वेळी लावलेली रोप , आदी परिसरातील जनावरे खाऊन तोडून टाकीत व विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वाफ्यांची नास धुस करीत त्यामुळे विद्यार्थ्यानी आवडीने लावलेल्या रोपांची व त्यासाठी घेतलेली काळजी परंतु या नाश धुशी मुळे विद्यार्थ्यांचा हिरमोड होईल म्हणून यावर काहीतरी कायमस्वरूपी उपाय झाला पाहिजे असा विचार झाला शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक श्री किशोर सोनसुरकर सर यांनी ही बाब पालक संघ शाळा व्यवस्थापन समिती यांच्यासमोर मांडले व याबाबत त्यांना माहिती दिली आणि यातूनच या अभिनव उपक्रमाचा जन्म झाला. मुख्याध्यापक श्री किशोर सोनसुरकर सर यांनी कायमस्वरूपी यासाठी कंपाउंड बांधून त्याच्या आत मध्ये सदर प्रात्यक्षिक करण्याबाबत विचार व्यक्त केला पण प्रश्न होता तो म्हणजे या बांधकामासाठी लागणारा खर्च यावर लगेचच उपाय म्हणून व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सुधीर गोलतकर यांनी आपण आवाहन करून हे पूर्ण करूया असे सांगितले. त्या प्रमाणे शाळेच्या माजी विद्यार्थी तसेच इयत्ता वार विद्यार्थी ग्रुप वर याबाबत माहिती पाठवून आवाहन करण्याचे ठरले. त्या वेळेला नुसते कंपाउंड बांधण्यासाठी मदत मिळेल का याबाबत चर्चा झाली त्यावर सोनसुरकर सर यांनी एक संकल्पना मांडली आपण आपल्या शाळेमध्ये इतर वर्ग खोल्यांप्रमाणे जसे इयत्ता पाचवी ते दहावी च्या वर्ग खोल्या असतात ज्यामध्ये विद्यार्थी बसून शिक्षण घेत असतात त्याच धरतीवर आपण आपल्या शाळेमध्ये अभिनव अशी ओपन एग्रीकल्चर क्लासरूम अर्थात आमची शेती बागकाम प्रयोगशाळा सुरू करूया आणि अशा प्रकारे या शेती प्रयोग ओपन एग्रीकल्चर क्लासरूम करण्याचे ठरले या वर्गखोलीमध्ये विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करताना त्यांना लागणारे साहित्य उदाहरणार्थ खोरे कुदळ खुरपी झारी इत्यादी त्याचबरोबर त्यांच्यासाठी वर्ग खोलीच्या चारी बाजूला बसण्यासाठी बैठक व्यवस्था आणि केलेल्या लागवडीसाठी योग्य ती पाणी व्यवस्था एकाच खोलीमध्ये उपलब्ध करून दिले तर विद्यार्थी आनंदाने आपले प्रात्यक्षिक कार्य पूर्ण करतील आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांनी तयार केलेले रोपे आदी यांचे पाळीव जनावरांपासून संरक्षण होईल आणि पेरणीपूर्व, पेरणी करताना, पेरणीनंतर, पीक तयार झाल्यानंतर आदी शेती विषयक टप्पे विद्यार्थ्यांना अनुभवता येतील त्याचबरोबर विद्यार्थ्यांना नेमून दिलेल्या भागांमध्ये विद्यार्थी मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनानुसार रोपातील वेगवेगळे होणारे बदल यांचा अभ्यास करतील आणि त्यामुळे दैनंदिन शालेय विज्ञान विषयांमधील या घटकांचा विद्यार्थ्यांना अभ्यास किंवा त्या घटकाचे आकलन होण्यास मदत होईल.

विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आणि पूर्ण झालेल्या पिकापासून उदाहरणार्थ पालेभाजी, फळभाजी आदींचे प्रत्यक्ष काढणे ते विक्री याचे व्यवस्थापन करण्यासाठी शाळेसमोर एक कायमस्वरूपी स्टॉल तयार करण्यात येईल शाळा भरण्यापूर्वी मधल्या सुट्टी मध्ये किंवा शाळा सुटल्यानंतर नियोजित गटांप्रमाणे विद्यार्थी त्यांनी तयार केलेल्या शेतमालाची विक्री करतील. आमची शाळा बचत शाळा.

शाळेमध्ये यापूर्वी बचत शाळा हा उपक्रम सुरू केलेला आहे विद्यार्थ्यांनी त्यांना मिळालेल्या खाऊचे पैसे किंवा तंत्र शिक्षण विभाग अंतर्गत त्यांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री करून मिळालेल्या लाभाचे त्यांनी सुरू केलेल्या बँक खाते मध्ये सदर रक्कम त्यांच्या खात्यामध्ये विद्यार्थी जमा करतील आणि या खात्याच्या नियमाप्रमाणे सदरची रक्कम ही फक्त पुढील शैक्षणिक गरजेसाठीच विद्यार्थ्यांनी व पालकांनी वापरण्याचे ठरले आहे त्याप्रमाणे विद्यार्थी या उपक्रमाची कार्यवाही करतील शाळेच्या एकूण 25 विद्यार्थ्याने सारस्वत बँक या ठिकाणी एकत्रित बँक खाते काढले आहेत प्रत्येक विद्यार्थ्यांच्या खात्यावर रुपये 1000 पेक्षा अधिक रक्कम जमा केली आहे.

शाळेने सुरू केलेल्या या अभिनव योजनेचे पालक वर्गातून तसेच माजी विद्यार्थी ग्रामस्थ त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रातील जाणकार मंडळी यांनी अभिनंदन करून शाळेच्या या उपक्रमास शुभेच्छा व्यक्त केले आहेत. ओपन एग्रीकल्चर क्लासरूम शेती प्रयोगशाळा हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक शाळेमध्ये राबविला जावा अशी इच्छा शाळेचे मुख्याध्यापक श्री किशोर सोनसुरकर सर यांनी व्यक्त केली लवकरच याबाबत एक निवेदन माननीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांना देणार असल्याचे सांगितले जेणेकरून शालेय विद्यार्थ्यांना शेती या पवित्र क्षेत्राचे महत्व समजेल आणि शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे उपयुक्त ठरेल.

दाभोली हायस्कूलमध्ये सुरू असलेल्या विविध उपक्रमातून शालेय शिक्षणं सोबत तंत्रशिक्षण जोड , बचत शाळा , शालेय पेज योजना माजी विद्यार्थि सहभागातून शाळा विकास, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत शाळा सजावट शालेय बोलका परिसर, शालेय बगीचा , व्यसनमुक्ती बाबत विविध उपक्रम विविध क्रीडा शिबिरे आदी यामुळे भविष्यामध्ये दाभोली पॅटर्न हा महाराष्ट्र मध्ये सर्वत्र राबवले जाईल अशी इच्छा अनेक मान्यवरांनी व्यक्त केली. शाळेच्या या प्रगतीचे सर्वांनी कौतुक करून शालेय कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले पालक शिक्षक ग्रामस्थ जाते यांचे आभार व्यक्त केले.