विकास आणि अफवा…!

संतोष वायंगणकर

लोकसभा निवडणुक ही देशाची निवडणुक आहे. देशाचं भवितव्य ठरविणारी, भविष्यातील देशाची वाटचाल कशी राहिल हे सांगणारी ही निवडणुक आहे. यामुळे ग्रामपंचायत निवडणुक जशी गावाचं भल कोण करणार, गावाकडे कोण लक्ष देणार हे पाहूनच गावाचं नेतृत्व कोणाकडे द्यायचं याचा विचार केला जातो. गावकरी तो विचार करूनच गावच्या नेतृत्वाची सरपंचपदाची धुरा त्या व्यक्तिकडे देतात.

इथे तर देशाच नेतृत्व कोणाकडे द्यायचं, स्थिरता आणि अस्थिरता या दोन्हीकडे पाहिल्यास स्थिरतेला प्राधान्य दिलं जातं. तोच विचार पुढे नेला जातो. आज जगभरातील देशा-देशातील संघर्ष युद्धजन्य स्थिती या अशा जगावर युद्धाचे ढग जमा झालेले असताना, युद्धाचे सावट असताना देशाच नेतृत्व खंबीर नेतृत्वाच्या हाती असायला हवं असं वाटत असल्यानेच या लोकसभा निवडणुकीत महायुती आणि इंडिया आघाडी याच्या नेतृत्वाचा आणि उमेदवारांचा विचार नागरिक करू लागले आहेत. तशा प्रकारच्या चर्चा होताना दिसत आहेत. महाराष्ट्रामध्ये जेव्हा निवडणुकापूर्वी व्हायच्या तेव्हा शेतकऱ्यांच्या आणि विकासाच्या प्रश्नावर निवडणुका होत होत्या.

कोणत्याही निवडणुकांमध्ये उमेदवारांने त्यांना मिळालेल्या पदांच्या कार्यकाळात काय केलं आणि या निवडणुकीत निवडून आल्यावर काय करणार हे जनतेसमोर मांडण्याची जबाबदारी निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांची असते. परंतु कोकणात कोणतीही निवडणुक असली तरीही विकासावर चर्चा कधीही केली जात नाही. आजही निवडणुक लोकसभेची आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गच नव्हेतर कोकणच भवितव्य ठरवणारी ही निवडणुक आहे. कोकणचे प्रश्न, समस्या, राज्यस्तरावर सुटणारे प्रश्न केंद्राकडून निर्माण होणाऱ्या वाटा या अशा विकासावर चर्चा होत राहिली असती तर ते अधिक योग्य ठरले असते. परंतु दुर्दैवाने खोट आणि असत्यावर आधारित अफवा पसरवून जनतेला संभ्रमित करता येते. त्यात राजकीय हेतू साध्य करता येतो असं ज्यांना-ज्यांना वाटत ते अफवा पसरवून बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करतात. अफवा पसरवून निवडणुकीत निवडून येता येत हे तंत्र ज्यांना अवगत झालं आहे ते पुन्हा-पुन्हा त्याच तंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न होताना दिसतो.

अफवांची ही गोबेलसनीती कोकणविकासाला निश्चितच मारक आहे. कोकणात विकासावर चर्चा होताना एक मुद्दा नेहमी चर्चेत असतो कोकणात बेकारी आहे. शासन काही करत नाही. परंतु हे असे प्रश्न उपस्थित होत असताना कोकणातील जनतेने एका प्रश्नाच उत्तर स्वत:पाशीच शोधल पाहिजे. आपण कोणावर विश्वास ठेवलो, खर कोण बोलतो, खोट अफवा कोण पसरवतो हे समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक चांगल्या कामात विरोध कोण करतोय. विरोध का, कशासाठी केला जातोय. विरोधामागे जनतेने हित की स्वत:चा स्वार्थ या प्रश्नांचा शोधही ज्यांनी त्यांनी घेतला पाहिजे.

अफवांचे बुडबुडे निवडणुका झाल्या की हवेतच विरतात. त्या अफवांच काम संपलेलं असत. यामुळे या गोष्टींचा विचारही जनतेने करण्याची आवश्यकता असते. निवडणुका येतील आणि जातील. परंतु कोकणातील बेरोजगारी, आर्थिक दुर्बलता कशी होणार ? निसर्गाच्या सानिध्यात राहणारा कोकणवासिय सुखी, समाधानात, आनंदात कधी दिसणार, या सगळयाचा विचार कोकणवासिय तरी कधी करणार ? हाच खरा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतो. कोकणवासियांना अफवांवर विश्वास ठेवून वाटचाल करायची आहे, की विकासाच नव दालन निर्माण करायच आहे.

हे ठरवायला हवं. अर्थात बुद्धीभेद करणाऱ्यांना विकास नकोय. जर विकास झाला तर रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या तर लोक विचार करायला लागतील. चांगल-वाईट ठरवतील नेमक तेच नको असल्याने अफवांमध्येच जनतेला गुंतवून ठेवून कोकणचे नुकसान केले जाईल. हे होणार नाही. याची काळजी मात्र घेतली पाहिजे.