विकासाचे मुद्दे नसल्याने महाविकास आघाडीकडून संविधानाबाबत अपप्रचार

भाजपाचे अनुसूचित जाती जमाती जिल्हाचिटणीस चंद्रकांत जाधव यांचा आरोप

दलित बांधव अपप्रचाराला बळी पडणार नसून मोदींच्या पाठीशी

काँग्रेसकडूनच १०६ वेळा घटना दुरुस्ती व अनेक त्रुटी

सावंतवाडी । प्रतिनिधी : बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न द्यायला ३४ वर्ष लावणारे काँग्रेस आणि त्यांच्या सोबत असणारे मित्रपक्ष देशाचे पंतप्रधान संविधान बदलणार असे सांगत आहे. मात्र त्यांच्याकडे प्रचाराचे मुद्देच नसल्याने ते संविधानाच्या मुद्द्यावरून दलित बांधवांमध्ये गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप भाजपाचे अनुसूचित जाती जमाती जिल्हा चिटणीस चंद्रकांत जाधव यांनी केला.

चंद्रकांत जाधव यांनी महायुतीच्या प्रचार कार्यालयात पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीच्या आरोपांना उत्तर दिले. यावेळी त्याच्यासोबत अनुसूचित जाती जमाती महिला जिल्हाध्यक्ष सोनिया मठकर, जिल्हा कोषाध्यक्ष अनंत आसोलकर, राजेश चव्हाण, प्रकाश कदम,वासुदेव जाधव, संजय डिंगणेकर, महेश चव्हाण, किशोर निगुडकर,उमेश मठकर आदी उपस्थित होते.

महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत आणि कार्यकर्त्यांकडे प्रचाराला मुद्देच राहीले नसल्याने ते पंतप्रधान मोदी देशाचे संविधान बदलणार असा प्रचार करत आहे. मुळात विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याने ते असे वक्तव्य करत आहेत. मात्र, काही झाले तरी दलित बांधव एक दिलाने नारायण राणे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहेत, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

संविधान बदलणार असे काँग्रेस आणि मित्र पक्ष म्हणत असतील तर बाबासाहेब आंबेडकरांना यांना याच काँग्रेस कडून भारतरत्न द्यायला ३४ वर्षे का लागली. या लोकांनी दलिता बांधवांच्या वाडीवस्तीवर जाऊन कधी संविधानाचा गौरव केला आहे का ? उलट काँग्रेसकडून १०६ वेळा घटना दुरुस्ती केली गेली आणि या दुरुस्त केलेल्या घटनेमध्ये अनेक त्रुटी राहिल्या आहेत. त्या त्रुटी सुधारण्यासाठी चारसौ पारचा नारा मोदींनी दिला आहे. त्यामुळे कोणी कितीही डोकी भडकवण्याचा प्रयत्न केला तरी दलित बांधव कुठेही भरकटणार नाही. मोदींना साथ देण्यासाठी नारायण राणे यांना प्रचंड बहुमताने निवडून देऊन पुन्हा एकदा लोकसभेत पाठवणार आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.