देवगड / प्रतिनिधी
मूळ पुरळ – हुर्शी येथील व सध्या पुणे- कोथरुड येथे वास्तव्यास असलेला अनिरुद्ध विजय करंदीकर (२२) हा युवक सोमवारी सायंकाळी ५.३० वा. च्या सुमारास पुणे – कोंढवा येथे झालेल्या एका विचित्र अपघातात गंभीर जखमी झाला होता. पुण्यातील ससून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, बुधवारी सकाळी ९.३० वा. च्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे हुर्शी गावावर शोककळा पसरली आहे.
पुणे येथे महाविद्यालयीन शिक्षण घेणारा अनिरुद्ध हा वडील विजय करंदीकर यांच्या आंबा स्टॉलच्या व्यवसायात हातभार लावत असे. विजय करंदीकर हे आंबा बागायतदार व व्यावसायिक आहेत. सोमवारी सायंकाळी ५.३० वा. च्या सुमारास अनिरुद्ध हा आपला मित्र केवल खानविलकर (सडेवाघोटन- देवगड) याच्यासमवेत कोंढवा रस्त्यावर दुचाकीने आंबा पेटीची ‘होम डिलिव्हरी’ देण्यासाठी जात होता. या रस्त्यावर अवजड ‘केबलच्या लाकडी रोल’ची वाहतूक करणाऱ्या ट्रक (ड्रम ट्रेलर) मधील केबल रोलचा दोरखंड तुटला व केबल रोल ट्रकच्या हौद्यातून रस्त्यावर गाड्यांवर धडकले. यात अनिरुद्धच्या दुचाकीचाही समावेश होता. या अपघातात अनिकेतच्या डोक्याला, तर केवल याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य राबवून जखमींना रुग्णालयात दाखल केले. केवल याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. तर अनिरुद्ध याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान बुधवारी सकाळी त्याची प्राणज्योत मालवली. अनिरुद्धच्या पार्थिवावर हुर्शी येथे मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. पश्चात आई, वडील, मोठा भाऊ, आजी, आजोबा, काका – काकी असा परिवार आहे.












