नागपूर : १ जुलैपासून शाळा सुरू होणार असून पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके मिळणार आहे. ग्रामीण भागातील १.५४ लाख विद्यार्थ्यांना या मोफत पाठ्यपुस्तके योजनेचा लाभ मिळणार असून १५ मेपासून बालभारतीतून तालुकास्तरावर पाठ्यपुस्तके पोहचती होतील.
शासनाच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत दरवर्षी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके दिली जातात. शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांच्या हाती पुस्तके मिळावीत, यासाठी शिक्षण विभागाकडून गेल्या काही दिवसांपासून नियोजन सुरू आहे. बालभारतीकडे पुस्तकांसाठी ऑनलाइन नोंदणीही करण्यात आली होती.
जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून इयत्ता १ ते ८ च्या १ लाख ५४ हजार ३२ वर विद्यार्थ्यांसाठी एकात्मिक पाठ्यपुस्तक योजनेंतर्गत पाठ्य पुस्तकांची नोंदणी फेब्रुवारी महिन्यातच बालभारतीकडे करण्यात आली. शाळांनी भरलेल्या युडाएस माहितीनुसार पहिली ते पाचवीपर्यंत ९३ हजार ७८, सहावी ते आठवीपर्यंत ६० हजार ९५४, अशी एकूण १ लाख ५४ हजार ३२ विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली.
शाळांना मागणीनुसार पाठ्यपुस्तकांचे वितरण होणार आहे. तालुकास्तरावर पाठ्यपुस्तकाच्या वितरणाची जबाबदारी गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार १५ मे २०२४ पासून बालभारतीच्या बुटीबोरी डेपोतून पुस्तकांची उचल करून तालुकास्तरावर वितरणही होईल. त्यानंतर तेथून पुस्तके शाळास्तरावर वितरित होतील.













