खेड(प्रतिनिधी) येत्या काही दिवसात पावसाळी वातावरण राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असतानाच आज संध्याकाळी खेड शहर परिसरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात पावसाचा शिडकावा झाला. शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळात खेडच्या ग्रामीण भागात वादळ सदृश्य वार्यांनी अनेक झाडे कोसळली. अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटून विद्युत पुरवठा खंडित झाला.
सायंकाळी साडेपाचच्या सुमारास या ठिकाणी अचानक जोरदार वारा सुटला वादळ सदृश वार्याने या परिसरातील अनेक ठिकाणी झाडे कोसळुन नुकसान झाले. ऐन उन्हाळ्यामध्ये विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे ग्रामस्थ उकाड्याने हैराण झाले आहेत. जोरदार वाऱ्यामुळे आंबा-काजूच्या बागा यांचे मोठे नुकसान झाले असून, ऐन आंबा काजूच्या मोसमातच वादळी वार्याच्या तडाखा बसल्यामुळे बागायतदार हताश झाले आहेत. अचानक झालेल्या पावसामुळे खेड बस स्थानकातून ग्रामीण भागात जाणाऱ्या प्रवाशांची मात्र धावपळ उडाली.
ऐन मे महिन्यात कोसळू लागलेल्या अवकाळी पावसामुळे हापूस, काजू, करवंद, जांभूळ या कोकण मेव्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलांमुळे कोकणातील आंबा काजू ही पिके आधीच धोक्यात आली आहेत. त्यात आता पुन्हा अवकाळीचा संकट आले असल्याने हापूस आणि काजूचे नगदी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.










