दयाळ-जंगमवाडीची पाण्याची वणवण थांबणार

 

मुंबई महाराष्ट्र महाविद्यालयाकडून विंधन विहिरीची दुरूस्ती, ग्रामस्थांना दिलासा

खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील दयाळ-जंगमवाडी येथील ग्रामस्थांना सतावणारी पाणीटंचाईची समस्या निकाली निघाली आहे. जल फाऊंडेशन व सामाजिक कार्यकर्ते खालिद चौगुले यांनी मुंबई महाराष्ट्र महाविद्यालयाचे प्राध्यापक सिराज चौगुले यांच्या पुढाकरातून गेल्या ७ महिन्यांपासून बंदावस्थेत असलेल्या विंधन विहिरीची दुरुस्ती करण्यात आल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

दयाळ-जंगमवाडी येथील ग्रामस्थांना १० ते १२ वर्षांपासून विंधन विहिरीच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू होता. मात्र गेल्या ७ महिन्यांपासून विंधन विहिरीला पाणी येणेच बंद झाल्याने ग्रामस्थांची गैरसोय झाली होती. रणरणत्या उपलब्ध जलस्त्रोतही उन्हामुळे आटल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू होती.

याबाबत ग्रामस्थांनी बहिरवलीचे सामाजिक कार्यकर्ते खालिद चौगुले व जल फाऊंडेशन कोकण विभाग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन जाधव यांच्याकडे साकडे घालत निवेदन दिले होते. त्यांनी प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेत विंधन विहिरीची दुरूस्ती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबई महाराष्ट्र महाविद्यालयाचे प्राध्यापक सिराज चौगुले यांच्या सहकार्याने विंधन विहिरीची दुरूस्ती करण्यात आली. यामुळे मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांची पाणीटंचाई संपुष्टात आली आहे.