तहसीलदार वर्षा झालटे यांचे कौतुकोद्गार ; सरपंच किशोर त्रिंबककर यांनी उपक्रमाचे श्रेय दिले ग्रामस्थांच्या एकीला
अमित खोत | मालवण : त्रिंबक गावचा प्रमुख पाण्याचा स्रोत असलेला गावातील वहाळ (ओढा) झाडे-झुडपे आणि गाळाने लुप्त होत असताना गावाने एकत्र येत वहाळ पुनर्जिवीत करण्यासाठी राबवलेला श्रमदान उपक्रम आदर्शवत असाच आहे. गावात पूर्वी प्रमाणे उन्हाळा, पावसाळा या कालावधीत होणाऱ्या दोन्ही शेतीसाठी तसेच गावातील विहिरिंच्या पाण्याची पातळी व पाणी स्रोत वाढवण्यासाठी ग्रामस्थानी घेतलेला पुढाकार अभिनंदनीय आहे. ग्रामस्थ, ग्रामपंचायत यांच्या मागणी नुसार या उपक्रमाच्या पुढील टप्प्यासाठी शासकीय मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे तहसीलदार वर्षा झालटे यांनी वहाळ पुनर्जिवन उपक्रम पाहाणी दरम्यान स्पष्ट केले.

त्रिंबक गावात तहसीलदार वर्षा झालटे यांचे स्वागत सरपंच यांच्या वतीने करण्यात आले. वहाळ ठिकाणी सूरू असलेल्या पुनर्जिवीत उपक्रमाची पाहाणी करण्यात आली. यावेळी सरपंच किशोर त्रिंबककर, ग्रामसेविका माधुरी कामतेकर, मंडळ अधिकारी सुहास चव्हाण, ग्रापसदस्य सुचिता घाडीगांवकर, सपना तेली, संतोषी सावंत, सागर चव्हाण, रोहित त्रिंबककर यांसह अन्य अधिकारी उपस्थित होते.
मालवण तालुक्यातील त्रिंबक गावाच्या तीन बाजूंस हिरवेगार डोंगर. या गावाच्या माध्यतून वहाळ वाहतो. वहाळाचा उगम पाणलोस गावातून होतो. पळसंब येथे त्रिंबक गावची हद्द सुरु होते त्या ठिकाण पासून त्रिंबक बागवेवाडी खारीनदी भगवंतगड येथे हा वहाळ मिळतो. एकूण पाच किलोमीटर लांब हा वहाळ आहे. अनेक ठिकाणी मोठ्या स्वरूपात असलेले हे पात्र नदी चे स्वरूप प्राप्त करणारे ठरते. गावात गावकोंडी ठिकाणी पात्राची रुंदी विस्तारते तशी खोलीही वाढते. पुर्वी याच वाहणाऱ्या पाण्यावर दोन्ही काठांवर उन्हाळ्यात हिरवेगार शेत मळे फुलत. मात्र गेल्या काही वर्षांपासून पाण्याच्या प्रवाहाला वाढलेली झाडी झुडपे, गाळ यामुळे पाण्याचा प्रवाह पावसानंतर बंद होतो अशी स्थिती निर्माण झाली. गावातील लोकांनी शेती कमी केली. माकडांचा वाढलेला त्रासानेही शेतकरी त्रस्त बनले. उन्हाळी शेती बंदच झाली अशी स्थिती झाली.
पावसाळ्यात तर पुराचे पाणी नदीपात्रातून न वाहता ते काठांवरच्या भात शेतीत घुसते. त्यामुळे दरवर्षी भातशेतीचे अतोनात नुकसान होते. त्यामुळे पावसाळी शेतीवरही परिणाम झाला. याच समस्यांवर मार्ग काढण्यासाठी वहाळ पुनर्जिवीत संकल्पना समोर आली.
याबाबत माहिती देताना सरपंच किशोर त्रिंबककर यांनी सांगितले, त्रिंबक गावातील पाण्याचा प्रमुख स्रोत असलेल्या वहाळ झाडीझुडपानी वेढला होता. अनेक ठिकाणी पात्र बुजून गेले होते. काही ठिकाणी प्रवाह बदलून गेला होता. वहाळ पुनर्जीवीत करण्याचा उपक्रम हाती घेण्याचा निर्णय गावात ग्रामस्थांच्या वतीने एकमुखाने घेण्यात आला. ज्यावेळी सरपंच म्हणून विजयी झालो तेव्हा पासून ग्रामस्थांची याबाबत मागणी होती. अखेर त्या उपक्रमाची मुहूर्तमेढ ग्रामस्थांच्या एकीतून रोवली गेली. लोकवर्गणीतून काही अपेक्षित रक्कम जमा झाली. अन प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली.
सुरवातीला वहाळ पात्रातील झाडी झूडपे तोडणे, माती सपाटीकरण करणे तसेच ज्या ठिकाणी प्रवाह बदललेला आहे तो पूर्ववत करणे ही कामे हाती घेण्यात आली. पाच किलोमीटर लांब असलेले या वहाळाच्या पात्रापैकी गेल्या काही दिवसात तीन ते चार किलोमीटर अंतरावरील काम पूर्ण करण्यात आले आहे. येत्या दोन चार दिवसात उर्वरित काम पूर्ण पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील. भविष्यात दुसरा टप्पा हा वहाळ खोलीकरण हा असणार आहे. त्यात ग्रामस्थ्यांच्या सहभागा सोबत ग्रामपंचायत व शासन स्तरावरून मदतीसाठी पर्यंत केले जाणार आहेत. असे सरपंच किशोर त्रिंबककर यांनी सांगितले.
‘जागृत त्रिंबक’ ग्रुपची स्थापना
वहाळ पुनर्जिवीत उपक्रमासाठी सरपंच किशोर त्रिंबककर व संतोष त्रिंबककर यांच्या संकल्पनेतून ‘जागृत त्रिंबक’ ग्रुपची स्थापना संतोष त्रिंबककर यांच्या माध्यमातून 1 एप्रिल रोजी करण्यात आली. स्थानिक ग्रामस्थ तसेच मुंबईस्थित ग्रामस्थ यांच्या सहभागातील या ग्रुपला चांगला प्रतिसाद लाभला. त्या नंतर गावातील ग्रामस्थ यांच्या सोबत बैठक घेऊन वहाळ पुनर्जिवीत संकल्प सांगण्यात आला. ग्रामस्थ यांनी पाठिंबा देत आठ दिवसात काम सुरु झाले.
पुन्हा गाव हिरवागार होईल
गावातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत वाढतील. उन्हाळ्यात तळ गाठणाऱ्या विहिरीच्या पाण्याची पातळी वाढेल. हा उद्देश या उपक्रमाचा आहे. तसेच उन्हाळी शेती जी या पूर्वी मोठ्या प्रमाणात होत होती. ती उन्हाळी शेती पुन्हा सुरु होईल. शेतीचे क्षेत्र वाढेल हा ही प्रयत्न राहणार असल्याचे सरपंच यांनी सांगितले. तसेच भविष्यात वहाळ खोलीकरण हा टप्पा ग्रामस्थ तसेच शासन या माध्यमातून राबवला जाईल. वाहळाच्या दोन्ही बाजूला ठराविक अंतरावर माड वृक्षांची लागवड करण्याचाही मानस आहे. सर्वांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी पणे साकार होईल असा विश्वास सरपंच किशोर त्रिंबककर यांनी व्यक्त केला.












