कोल्हापूर व मुंबईतील सहा आरोपींना अटक
सावंतवाडी:सावंतवाडी शहरातील एका बँकेमध्ये भरलेल्या पैशात २०० रुपयांच्या ८ बनावट नोटा आढळल्याप्रकरणी बँक मॅनेजर यांनी दिलेल्या तक्रारीवरून सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासात या बनावट नोटांचे ‘सांगली कनेक्शन’ उघड झाले असून, पोलिसांनी या प्रकरणी सहा आरोपींना अटक केली आहे.
सावंतवाडीत सापडलेल्या बनावट नोटांच्या सीरियल नंबरची सिरीज आणि सांगली शहरातील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडे दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील जप्त नोटांची सिरीज एकच असल्याचे तपासात निष्पन्न झाले. यावरून दोन्ही गुन्ह्यातील आरोपींचे धागेदोरे जोडले गेले. या माहितीच्या आधारे सावंतवाडी पोलिसांनी सांगली न्यायालयाच्या आदेशाने सांगली जेलमधून सहा आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये सुप्रीत कडप्पा देसाई (वय २२), राहुल राजाराम जाधव (वय ३३), इब्रार आदम इनामदार (वय ४४), नरेंद्र जगन्नाथ शिंदे (वय ४०), सिद्धेश जगदीश म्हात्रे (वय ३८, रा. मालाड मुंबई) आणि संदीप बाळू कांबळे (वय ३८) यांचा समावेश आहे. सिद्धेश म्हात्रे हा मुंबईचा रहिवासी असून, इतर सर्व आरोपी कोल्हापूर येथील रहिवासी आहेत.
या आरोपींना काल रात्री उशिरा सावंतवाडीतील गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.












