राजापूर | प्रतिनिधी : दुचाकी चोरून कोल्हापूरच्या दिशेने पळून जाताना पोलिसांना पाहून अणुस्कूरा घाटातील जंगलात लपलेल्या अन्य दोन चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. सलग दोन दिवस जंगलात शोधमोहीम राबविल्यानंतर आज सकाळी या दोन चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दोन बाईक वरून तीन अनोळखी तरुण ओणीमध्ये आले होते
चारचाकी वाहनांना धाक दाखवून त्यांना लुटण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात होता. यावेळी झालेल्या आरडाओरडीनंतर त्या तरूणांनी तेथून पळ काढून ते ओणी येथून अणुस्कुरा घाटमार्गे कोल्हापूरच्या दिशेने दोन बाईकवरून निघाले होते. दरम्यान, याबाबतची माहिती रायपाटण पोलिस दूरक्षेत्राला मिळाल्यानंतर अणुस्कूरा चेकपोस्ट येथे पोलिसांनी कडक नाकाबंदी केली. तिघे संशयित तरूण मोटर सायकलवरून अणुस्कुरा चेकपोस्टवर आले असता तेथील पोलिस नाकाबंदी असल्याचे पाहून याठिकाणी पकडले जाण्याच्या भितीने त्यांनी तिथे ताब्यातील दुचाकी सोडून येरडव, अणुस्कूरा जंगलामध्ये पळ काढला. त्यानंतर, जिल्हा पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा फौजफाटा तैनात करून येरडव आणि अणुस्कूरा जंगल परिसर ग्रामस्थांच्या साथीने संशयितांना ताब्यात घेण्यासाठी पिंजून काढला. त्यामध्ये एकजण पोलिसांच्या तावडीत सापडला तो अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर अन्य दोघे जंगलात लपून बसले होते. शनिवार रात्रीपासून जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूर पोलीस निरीक्षक श्री. चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक श्री. उबाळे, उपनिरीक्षक श्री. शेख, आरसीपी टीम इन्चार्ज श्री. साखरकर यांच्यासह राजापूर पोलीस व आरसीपी टीमच्या कर्मचारी सलग दोन दिवस जंगल परिसर पिंजून काढत संशयितांचा शोध घेत होते. आज सकाळी संशयित दोघे जंगलातून बाहेर येवून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना पोलिसांनी त्या दोघांनाही ताब्यात घेतले आहे. दीपक श्रीमंदीलकर, अजय घेडगे (दोघे रा.अहमदनगर) अशी त्या ंसशयितांची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. संशयितांचा शोध घेवून त्यांच्या मुसक्या आवळण्याच्या पोलिसांनी केलेल्या यशस्वी कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.










